‘पतीची गर्लफ्रेंड नातेवाईक नाही’ : मुंबई उच्च न्यायालयाने असे का म्हटलं?

‘पतीची गर्लफ्रेंड नातेवाईक नाही’ : मुंबई उच्च न्यायालयाने असे का म्हटलं?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पतीची गर्लफ्रेंड (प्रेयसी) ही  त्‍याची नातेवाईक मानली जावू शकत नाही. जर एखाद्या पतीने पत्नीला मारहाण केली तर पतीच्‍या गर्लफ्रेंडला कौटुंबिक हिंसाचारात होणाऱ्या क्रौर्यासाठी दोषी ठरवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्‍च न्‍यायालयाने पत्‍नीने पतीच्‍या गर्लफ्रेंडविरुद्ध घरगुती हिंसाचार प्रकरणी दाखल केलेल्‍या गुन्‍हा रद्द करण्‍याचे आदेश दिले.

पतीच्‍या गर्लफ्रेंडची उच्‍च न्‍यायालयात याचिका

'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, नाशिकमध्‍ये २०१६मध्‍ये विवाह झालेल्‍या दाम्‍पत्‍याच्‍या नात्‍यात तणाव निर्माण झाला. २०२२ मध्‍ये पत्‍नीने दिलेल्‍या तक्रारीनुसार, पती आणि त्‍याच्‍या आई-वडिलांविरुद्‍ध IPC कलम ४९८ अ (पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून पत्नीवर क्रूरता) आणि इतर अनेक कलमांखाली गुन्‍हा दाखल झाला. तसेच पत्नीने पतीचे दुसऱ्या महिलेसोबतचे विवाहबाह्य संबंध असल्याचे फिर्यादीत म्‍हटलं होते. डिसेंबर 2022 मध्ये पत्नीने दाखल केलेल्या खटल्‍यात पतीच्या मैत्रिणीवर 'मानसिक क्रूरते'चा आरोप करण्यात आला होता. याविरोधात पतीच्‍या गर्लफ्रेंडने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्‍च न्‍यायालयातील न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर १८ जानेवारीला सुनावणी झाली.

उच्‍च न्‍यायालयाने दिला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला

सर्वोच्च न्यायालयाने २००९ मध्‍ये एका प्रकरणी दिलेल्‍या आपल्या निर्णयात कलम ४९८अ अंतर्गत क्रूरतेची व्याप्ती स्‍पष्‍ट करताना म्‍हटलं होतं की, "क्रूरता हे असे वर्तन आहे जे एखाद्या महिलेला आपलं जीवन संपविण्‍यास प्रवृत्त करते किंवा गंभीर दुखापत किंवा तिच्या जीवाला, अवयवांना किंवा आरोग्यास (मानसिक किंवा शारीरिक) धोका निर्माण करण्याची शक्यता असते; परंतु सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की, अशा प्रकारात केवळ रक्ताचे नाते, विवाह किंवा दत्तक घेऊन संबंधित व्यक्तींनाच नातेवाईक मानले जावे."

'पतीची गर्लफ्रेंड नातेवाईक नाही'

या प्रकरणीच्‍या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने म्हटले की, या प्रकरणातील याचिकाकर्त्याला ( प्रेयसी ) ही तक्रारदाराच्या (पत्नी) पतीचा नातेवाईक मानता येणार नाही. याचिकाकर्त्यावर फक्त तक्रारदाराच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे, त्यामुळे पती तिच्‍याबरोबर लग्न करण्यासाठी पत्नीवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकला किंवा चिथावणी दिल्याचा आरोप पत्‍नीने केलेला नाही. यामुळे प्रेयसीवर फौजदारी खटला चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग ठरेल, असे स्‍पष्‍ट करत उच्‍च न्‍यायालयाने पत्‍नीने पतीच्‍या गर्लफ्रेंडविरुद्ध घरगुती हिंसाचार प्रकरणी दाखल केलेल्‍या गुन्‍हा रद्द केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news