कसं जपायचं हृदय?

कसं जपायचं हृदय?
Published on
Updated on

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जगभरात हृदय विकाराने ग्रस्त असणार्‍या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढते ताणतणाव, आहाराचा असमतोल, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, स्थूलपणा, डिप्रेशन यामुळे आज हृदयविकार बळावत आहेत. हृदयाचं आरोग्य सुधारायचं तर शांत आणि पुरेशी झोप, पोषक आहार, पुरेसं काम, तणावमुक्त जीवन, नियमित व्यायाम, सकारात्मक विचार, भरपूर हसणे, निर्व्यसनीपणा या अष्टसूूत्रीचा अवलंब केला तर हृदयविकारांना नक्कीच 'बायबाय' करता येईल.

29 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक हृदय दिन' म्हणून पाळला जातो. तसं पाहता हृदय, विकार आणि माणसाचं वय यांचं प्रमाण आता सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी वयाची पन्नाशी-साठी ओलांडलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक आढळून येत असे; पण आजकालच्या ताणतणावाच्या वातावरणात हृदयविकार हा कोणालाही होऊ शकतो आणि त्यामुळे मरणार्‍यांची संख्या आजकाल वाढतेच आहे. अमेरिकेत 15 कोटी लोक हे हृदयविकाराने (कोरोनरी आर्टरी डिसीज) ग्रस्त आहेत. तिथे ज्येष्ठ नागरिकांपैकी एक तृतीयांश नागरिक हे हृदयविकाराने मरण पावतात. साधारण वयाच्या साठीनंतर हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढते.

त्यापैकी कोरोनरी हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, स्ट्रोक किंवा अर्धांगवायू, औषधांच्या साईड इफेक्टमुळे होणारा अर्‍हीथमियस, काँन्जेस्टीव हार्ट फेल्युअर, व्हेरीकोज व्हेन्स, अ‍ॅथेरोस्ल्कीरॉसिस म्हणजे रक्तवाहिन्यांचे अरुंद होतात, त्याचबरोबर रक्तवाहिन्यांच्या भिंती कमजोर होतात आणि त्यातील एखादी रक्तवाहिनी फुटली तर हार्ट अ‍ॅटॅक किंवा अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. काही वेळा अशा प्रकरणांमध्ये रुग्णाचा अचानक मृत्यूही होऊ शकतो.

ज्येष्ठ नागरिक आपली दुखणी फारशा गांभीर्याने घेत नाहीत. बरेच जण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. मात्र, त्यामुळे हृदयविकार बळावत जातो. यासाठी काही लक्षणांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. दिवसभर दमल्यासारखे वाटणे, खूप घाम येणे ही काही अशी छुपी लक्षणं आहेत ज्यामुळे छातीत न दुखताही हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो. ही लक्षणे जास्त करून मधुमेह असणार्‍या रुग्णांमध्ये जास्त आढळतात.

तापमानात अचानक होणार्‍या बदलांमुळेही ज्येष्ठ नागरिकांना हृदयविकार येऊ शकतो. खूप थंडी किंवा खूप गरम तापमानात ज्येष्ठ नागरिकांच्या हृदयाची हालचाल खूप जलद आणि अनियमित झाल्यामुळेही हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका असतो. आपल्या जोडीदाराचा किंवा जवळच्या मित्राचा आजार, अपंगत्व किंवा मृत्यूमुळे ताण येऊन मानसिक स्थितीचा असमतोल झाल्यामुळेही हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

ज्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार आहेत. त्यांचा रक्तदाब हा नेहमीच वाढलेला असतो. त्यामुळेही हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो. ज्या लोकांच्या रक्तामध्ये एका विशिष्ट लायपोप्रोटिनच एलीपीचे प्रमाण जास्त आढळते त्यांनाही हार्ट अ‍ॅटॅक येण्याची शक्यता असते. चयापचय प्रक्रियेत ग्लुकोजच्या वाढलेल्या प्रमाणामुळे, स्थूलपणामुळे, एलडीएल कोलेस्टेरॉलच्या वाढलेल्या लेव्हलमुळे, ट्रायग्लीसराईडचे प्रमाण वाढल्यामुळे आणि उच्च रक्तदाबामुळे हार्ट अ‍ॅटॅक येण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर इन्फ्लूएंझासारख्या आजारातही हार्ट अ‍ॅटॅक येण्याची शक्यता असते.

छातीत दुखणे, छातीवर प्रेशर आल्यासारखे वाटणे, ज्यामुळे अस्वस्थ वाटणे, श्वास कमी पडणे, हृदयाची धडधड वाढणे, हृदयाचे ठोके अनियमित पडणे, शुद्ध हरपणे, खूप दमल्यासारखे वाटणे, घाम येणे ही हार्ट अ‍ॅटॅक येतानाची काही लक्षणं आहेत. हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर अगदी काही मिनिटात जर व्यक्तीला ट्रिटमेंट मिळाली तर त्याच्या मृत्यूचा धोका टळू शकतो. परंतु, हार्ट अ‍ॅटॅक येऊच नये यासाठी जर प्रत्येक व्यक्तीने आपली काळजी घेतली तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.

हार्ट अ‍ॅटॅक येऊ नये यासाठी आपल्याला चांगल्या सवयी लावून घेणे महत्त्वाचे आहे. जसे रोज व्यायाम करणे, हृदयाचे आरोग्य बळकट करणारा आहार घेणे, कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करणे आदी गोष्टी करणे आवश्यक आहे. नियमित व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य सुधारायला मदत होते. याशिवाय वजन आटोक्यात ठेवणे किंवा कमी करणेही आवश्यक आहे. स्थूलपणामुळे शरीराचे आरोग्याला तसेच विशेषतः हृदयाला धोका पोहोचू शकतो. हार्ट अ‍ॅटॅकखेरीज, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक यांचीही शक्यता वाढते.

त्यामुळे चरबी वाढणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी चौरस आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. तुमचे आरोग्य हे तुम्ही काय खाता यावर अवलंबून असते. काही बी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ही हृदयासाठी चांगली असतात. भरपूर फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा. फास्ट फूड किंवा जंक फूडचे अतिसेवन हृदयासाठी घातक ठरू शकते.

धूम्रपान पूर्णपणे बंद करा. तंबाखू हा घटक हृदयविकारासाठी जास्त घातक आहे. उच्च रक्तदाब असणार्‍यांना हार्ट अ‍ॅटॅकचा धोका जास्त असतो, त्यामुळे त्यांनी आपला रक्तदाब नियमित तपासून तो आटोक्यात ठेवण्याच्या औषधांचा वापर करावा. मधुमेहींनी आपली रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवावी.

मधुमेही व्यक्तींमधे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मधुमेहींनी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासून ती नियंत्रित करावी, त्याचबरोबर वजन कमी करावे आणि सकस आहार घ्यावा. मानसिक ताणतणाव आणि अस्वस्थपणामुळे, तसेच जास्त खाणे, धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि व्यायामाचा अभाव यामुळेही हृदयविकार होऊ शकतो. त्यासाठी आपले ताणतणाव योग्य प्रकारे हाताळावेत. त्यामुळे आपल्या शरीराची हानी होणार नाही.

गंभीर डिप्रेशन किंवा निराशाजनक स्थितीमधेही उच्च रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे डिप्रेशनवर त्वरित उपाय केले जावेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जीवनशैली बदलावी. भरपूर झोप, ठरावीक वेळ काम, तणावमुक्त जीवन, नियमित व्यायाम, सकारात्मक विचार, भरपूर हसणे, धूम्रपान बंद, अल्कोहोल घेणे बंद असे जीवन जगायला शिकलो तर हृदयविकारच काय पण कोणताही आजार होण्याची शक्यता खूप कमी असते.

अशा प्रकारचे जीवन जगणे सगळ्यांना शक्य असते; परंतु अनेक कारणे देऊन आपण आरोग्याचा र्‍हास करतो आहोत हे कळायला खूप वेळ जातो आणि त्यानंतर कदाचित काही उपयोगही नसतो. 'वर्ल्ड हार्ट डे'च्या निमित्ताने अशाप्रकारची निरोगी जीवनशैली आत्मसात करण्याचा आणि हृदयाचं आरोग्य वाढवण्याचा संकल्प करूया.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news