जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : हनीट्रॅपची मोठी घटना देशात गाजत असताना, याच हनीट्रॅपचे लोण आता जामखेडच्या ग्रामीण भागातही पसरले आहे. फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी हनीट्रॅप टोळी जामखेड तालुक्यात सक्रीय असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ट्रक चालकाची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. जामखेड पोलिसांनी हनीट्रॅप करणार्या टोळीचा पर्दाफाश केला.
या प्रकरणी एकास अटक केली असून, अन्य आरोपी फरार आहेत. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील एका महिलेने फेसबुकच्या माध्यमांतून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका ट्रक चालकाशी मैत्री केली. दोघांमध्ये फेसबुकवर बराच काळ संवाद झाल्यानंतर या महिलेने आपला मोबाईल नंबर दिला अन् ट्रक चालकासोबत प्रेमाच्या गप्पा मारण्यास सुरुवात केली. काही काळानंतर या ट्रक चालकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पुढे दोघांमधील संवाद वाढल्याने चालकाचा विश्वास पटला. 11 मे रोजी या ट्रक चालकाला संबंधित महिलेने भेटण्यासाठी नान्नजला बोलावलेे.
ट्रक चालक नान्नजला आल्यानंतर संबंधित महिलेने घरी नेले. यानंतर त्या महिलेच्या नातेवाईकांनी चालकाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली अन् त्याच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु, चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने कपडे काढायला लावले व त्या महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत जबरदस्तीने फोटो काढले.
तसेच, पैसे दिले नाही, तर बलात्काराची खोटी तक्रार नोंदवू, अशी धमकी दिली. त्यामुळे संबंधीत चालकाने घाबरून जाऊन काही पैसे दिले. परंतु, आरोपी महिला व तिचे नातेवाईक दिलेल्या पैशाने समाधानी नव्हते. नंतर चालकाची पत्नी व इतर नातेवाईकांना चालकाच्याच मोबाईलवरून फोन करून पैशाची मागणी केली होती.
जामखेड पोलिसांनी चालकाच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेतला व सविस्तर चौकशी केली. चालकाच्या तक्रारीवरून जामखेड पोलिस ठाण्यात हनीट्रॅप करणारी महिला व तिच्या नातेवाईकांविरोधात कैदेत ठेवणे, खंडणी व दुखापतीचा गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपी फरार असून, जामखेड पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
या कारवाईबाबत जनतेतून पोलिसांचे कौतुक होत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे, पोलिस उपनिरीक्षक अनिलराव भारती व कर्मचारी यांच्या पथकाने अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
आपल्या पतीसोबत काहीतरी बरे वाईट घडत आहे, असे पत्नीच्या लक्षात आल्याने तिने 112 नंबरवर कॉल करत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने ट्रक चालकाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, ट्रक चालक हा जामखेड तालुक्यातील नान्नज येथे असल्याचे स्पष्ट झाले.
हनीट्रॅपमध्ये कोणी अडकले असल्यास न घाबरता त्यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधावा, पीडित व्यक्तीला न्याय देण्यात येईल. तसेच, हनीट्रॅप करणार्या टोळीचा कायमस्वरूपी बिमोड केला जाईल. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे अवाहन जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी केलेे.