Neeraj Chopra Win Gold : नीरजने चोप्राने सुवर्ण, किशोर जेनाने रौप्यपदक जिंकले

Neeraj Chopra Win Gold : नीरजने चोप्राने सुवर्ण, किशोर जेनाने रौप्यपदक जिंकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Neeraj Chopra Win Gold : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष भालाफेकीत भारतीय खेळाडू निरज चोप्राने (Neeraj Chopra)आपल्या 'गोल्डन आर्म'ची ताकद पुन्हा दाखवून दिली. त्याने अपेक्षेप्रमाणे खेळ करून भालाफेकीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे 17 वे सुवर्णपदक ठरले आहे. त्याच्यासह किशोर जेनानेही शानदार कामगिरी करून भारताचे रौप्यपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. किशोरनेही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या दोन खेळाडूंच्या पदकांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आता 80 वर पोहोचली.

भालाफेकमध्ये भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. नीरज चोप्राने 88.88 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला, तर किशोर जेनाने 87.54 मीटर लांब भाला फेकला. नीरजने 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर किशोरची ही पहिलीच आशियाई स्पर्धा असून त्याने रौप्यपदक पटकावले. जेनाचे हे कोणत्याही स्पर्धेतील पहिले पदक आहे. जपानच्या गेन्की डीनने 82.68 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले.

अंतिम फेरीच्या पहिल्या फेरीपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. या स्पर्धेत नीरजचा पहिला फेक तांत्रिक अडचणींमुळे मोजता आला नाही. त्यानंतर नीरजनने पुन्हा हा थ्रो घेतला आणि 82.38 चे अंतर कापले. याच स्पर्धेत भारताच्या किशोर कुमार जेनाने 81.26 मीटर लांब भाला फेकला. पहिल्या फेरीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. याशिवाय दुसऱ्या फेरीत नीरजला 84.49 मीटर फेक करण्यात यश आले. जो त्याच्या पहिल्या थ्रोच्या खूप पुढे होता. तर जेनाचा दुसरा थ्रो 79.76 मीटर पर्यंत गेला.

तिसर्‍या फेरीत किशोर आणि नीरज यांच्यात चुरस

तिसऱ्या फेरीत भारताच्या किशोर जेनाने नीरज चोप्राला मागे टाकले. किशोरने 86.77 लांब भाला फेकून आघाडी घेतली. यासह किशोरने नीरजला मागे टाकत सुवर्णपदकावर दावा केला. नीरजचा तिसरा थ्रो फाऊलमुळे मोजला गेला नाही. मात्र, यानंतर पुढील थ्रोमध्ये नीरजने किशोरला मागे टाकले. नीरजचा हा थ्रो 88.88 मीटरपर्यंत गेला. त्यामुळे तो पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला. किशोरही या फेरीत मागे राहिला नाही आणि त्याने 87.54 मीटर लांब भाला फेकला. यानंतर, पुढच्या फेरीत नीरजने 80.80 चा थ्रो फेकला आणि किशोरचा फाऊल झाला.

महिलांच्या 4X400 मीटर रिलेमध्ये भारताला रौप्य पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11 व्या दिवशीही भारतीय धावपटूंनी गाजवला. महिलांच्या 4X400 मीटर रिलेमध्ये भारताला रौप्य पदक मिळाले आहे. विथ्या रामराज, ऐश्वर्या कैलाश मिश्रा, प्राची सुभा, वेंकटेशन यांनी अंतिम फेरीत दुसरे स्थान पटाकावून पदक जिंकले.

अविनाश साबळेचे 5000 मीटर धावण्यात रौप्यपदक

भारतीय धावपटू अविनाश साबळेने 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. यापूर्वी त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. साबळेच्या दमदार कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या 77 वर पोहोचली आहे.


ग्रीको रोमनमध्ये कांस्यपदक

सुनील कुमारने आशियाई क्रीडा स्पर्धेत ग्रीको रोमन कुस्तीच्या 87 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. 2010 च्या नंतर आशियाई खेळांमध्ये भारतासाठी हे पहिले ग्रीको रोमन कुस्ती पदक ठरले आहे. गेल्या 13 वर्षांचा दुष्काळ त्याने संपुष्टात आणला आहे.


हरमिलन बेन्सची चंदेरी कामगिरी, महिलांच्या 800 मीटरमध्ये भारताला रौप्यपदक

भारतीय महिला धावपटू हरमिलन बेन्सने (harmilan bains) 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत शानदार कामगिरी करत आणखीन एका पदकावर मोहोर उमटवली आहे. बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने 2 मिनिटे 03.75 सेकंदाची वेळ घेत रौप्य पदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील हे तिचे दुसरे रौप्यपदक ठरले आहे. याआधी तिने रविवारी महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news