वसमत, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या करीच्या दिवशी महापोळा भरतो. यासाठी मराठवाड्यासह विदर्भातून यंदा जवळपास ३५ हजार बैलजोड्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत हजेरी लावली होती. यंदा जवळपास ५० हजार बैलजोड्या हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे साध्या पद्धतीनेच पोळा झाल्यानंतर यंदा मात्र, विक्रमी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वाई (गोरखनाथ) येथे ७०० वर्षांपासून दरवर्षी पोळ्याच्या दुसर्या दिवशी करनिमित्त ऐतिहासिक बैलपोळा साजरा केला जातो. गोरखनाथ देवस्थानला प्रदक्षिणा घालण्याकरिता जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बैलजोड्या येथे येतात. गोरखनाथाचे दर्शन घेतल्यास बैलांना कोणताच आजार होत नाही, अशी आख्यायिका सांगितली जाते. वाई गोरखनाथ संस्थान व गावकर्यांच्या वतीने येणार्या सर्व शेतकर्यांची नाष्टा व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर बैलांसाठी चारा मोफत उपलब्ध करुन दिला जातो.
यावेळी जिल्हा परिषद, पशु संवर्धन विभागाच्या वतीने पशुधनाची मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर घेण्यात आले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन वसमत ते औंढा या महामार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
हेही वाचलंत का ?