इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तानात होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच एक हिंदू महिला उमेदवार उभी राहिली आहे. खैबर पख्तुनवा प्रांतातील बुनेर मतदारसंघात डॉ. सविरा प्रकाश या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उमेदवार आहेत.
अबोटाबाद आंतरराष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातून 2022 साली डॉक्टर झालेल्या डॉ. सविरा प्रकाश यांनी मंगळवारी बुनेरच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डॉ. सविरा यांचे वडील ओमप्रकाश हे पीपीपीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून तेही निवृत्त डॉक्टर आहेत.
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीतील त्या पहिल्या हिंदू महिला उमेदवार आहेत. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, हिंदू समाजाच्या आणि एकूणच महिलांच्या कल्याणासाठी आपण काम करणार आहोत. महिलांचे विविध क्षेत्रात होत असलेली उपेक्षा कमी करण्याचा आपला प्रयत्न असेल.
डॉक्टर म्हणून सविरा प्रकाश बुनेर भागात लोकप्रिय असून त्यांनी उमेदवारी जाहीर करताच त्यांना तेथील सर्व समाजाकडून पाठिंबाही मिळू लागला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मोठ्या संख्येने आपण होऊन प्रचारात उतरण्याच्या तयारीत आहेत.