‘इसिस’च्या निशाण्यावर राज्यातील हिंदू नेते! ‘एनआयए’च्या चौकशीतील माहिती

‘इसिस’च्या निशाण्यावर राज्यातील हिंदू नेते! ‘एनआयए’च्या चौकशीतील माहिती
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : इसिसच्या संपर्कातील संशयित दहशतवादी मोहम्मद झोहेब खान (40, रा. बेरीबाग, हर्सूल) याच्या निशाण्यावर राज्यातील अनेक हिंदू नेते होते. त्यांची हत्या करण्याबरोबरच छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतील भाजपची कार्यालये बॉम्बने उडविण्याचाही कटही त्याने रचला होता. त्यासाठी त्याने पिस्तूल, दारूगोळा आणि सीमकार्डची जमवाजमव केली होती, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत समोर आली आहे. झोहेबने ही कबुली दिल्याचे एनआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

गुरुवारी (15 फेब्रुवारी) एनआयएने नऊ ठिकाणी छापे मारून झोहेबला छत्रपती संभाजीनगरातील बेरीबाग, हर्सूलमधून अटक केली होती. तेव्हापासून तो एनआयएच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. शिवाय, एनआयएची काही पथके तांत्रिक तपास करत आहेत. झोहेबच्या टेलिग्राम आयडीवरून अल-हिंद स्लीपर सेलच्या संपर्कात होता. मात्र, तो त्यांना कधीही भेटलेला नाही. त्याला भाजप कार्यालये आणि नेत्यांच्या हालचालींचा आढावा घेण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या मोहिमेला विशेष नाव दिले नव्हते. त्यामुळे झोहेब संभाजीनगरबाहेर कुठे गेला होता का, याचाही शोध एनआयए घेत आहे. तसेच, अल हिंदी मॉड्यूल स्लीपर सेलच्या सदस्यांची ओळख पटविण्याचे आव्हान एनआयएपुढे आहे.

झोहेब अबू अहमदच्या संपर्कात

झोहेब 2021 पासून इसिसचा हँडलर अबू अहमदच्या थेट संपर्कात होता. त्याने पत्नी आणि तीन मुलांसह इसिस खलीफा अबू-हफ्स- अल-कुरेशी याच्याशी व्हिडीओद्वारे शपथ (बायथ) घेतली होती. अबू हफ्सने 3 ऑगस्ट 2023 रोजी अधिकृतपणे इसिसचे नेतृत्व हाती घेतले. त्याचा पूर्ववर्ती अबू अल-हुसेन अल-हुसेनी अल-कुराशी यांच्या मृत्यूनंतर त्याला इस्लामिक स्टेटने खलीफा म्हणून घोषित केले आहे.

कोड होता 'सामान चाहिए'

अबू अहमदनेच झोहेबला अनस-अल-हिंदी आणि अनन-अल-हिंदी या नावाच्या टेलिग्राम आयडी लिंक शेअर केल्या होत्या. त्यावरूनच त्याने पिस्तूल, दारूगोळा आणि सीम कार्ड मागण्यासाठी 'सामान चाहिए', असा कोड दिला. झोहेबने या दोन्ही आयडींवर 'सामान चाहिए', अशी पोस्ट केल्यावर त्याला लवकरच माल वितरित केला जाईल, असा रिप्लायदेखील आला होता. त्यानुसार, भारतातील इसिस-अल-हिंदी मॉड्यूल स्लीपर सेलद्वारे दहशतवादी बॉम्बस्फोट आणि हत्या करण्यासाठी पिस्तूल, दारूगोळा आणि सीम कार्डस्ची व्यवस्थाही करण्यात आली होती. दोन्ही आयडींवरील त्यांचे हे संभाषण पहिले आणि शेवटचे ठरले. त्यानंतर लगेचच त्याला एनआयएने पकडले.

पत्नी झोहेबला सोडून गेली…

इसिसच्या खलिफासोबत व्हिडीओवरून शपथ घेतल्यानंतर झोहेबची पत्नी आणि तीन मुलांसह हिजराहसाठी सीरियाला स्थलांतरित होण्याची इच्छा होती; मात्र त्याच्या पत्नीने सीरियाला जाण्यास नकार दिला. तरीही त्याने इसिस हँडलर अबू अहमदच्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया सुरू केली. तथापि, त्याच्या पत्नीनेही तोच मार्ग स्वीकारावा, असे त्याला वाटत होते; पण पत्नीने तसे करण्यास नकार दिला आणि त्याला सोडून आपल्या मुलांसह ती वेगळी झाली. तरीही झोहेबने सीरियाला जाण्याचे ठरविले होते. त्यासाठी निधीची व्यवस्था करण्यास सुरुवात केली होती. त्याने भारतातून अफगाणिस्तानात स्थलांतर करण्याची योजना आखली होती. सीरियात जाण्यापूर्वी, अफगाणिस्तानातील त्याच्या हँडलरला भेटण्याचा त्याचा हेतू होता, असे तपासात समोर आले आहे.

इसिस हँडलरने झोहेबला दिले होते टास्क

इसिस हँडलरने झोहेबला काही टास्क दिले होते. त्याला इसिसमध्ये भरती करणे, ऑपरेशनसाठी पायदळांची व्यवस्था करणे, निधी उभारणे, दहशतवादी स्फोट आणि हत्येच्या योजना आखणे हे कामे दिली होती. एनआयएच्या तपासादरम्यान, हे उघड झाले की, झोहेबने सोशल मीडियावर व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी आणि भरती करण्यासाठी अनेक प्रोफाईल तयार केले. त्यांना इसिसमध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले. याव्यतिरिक्त, त्याने स्थानिक तरुणांना एकत्र केले, त्यांना कट्टरपंथी बनविले, इसिसमध्ये सामील होण्यासाठी त्यांची भरती केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news