Himachal Heavy Rain : हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर! 51 जणांचा मृत्यू, 751 मार्ग बंद

Himachal Heavy Rain : हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर! 51 जणांचा मृत्यू, 751 मार्ग बंद
Published on
Updated on

शिमला, पुढारी वृत्तसेवा : Himachal Heavy Rain : हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. राज्यात विविध ठिकाणी ढगफुटी आणि भूस्खलनामुळे 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिमला, सोलन, कांगडा येथे प्रत्येकी एका ठिकाणी, तर मंडीमध्ये दोन ठिकाणी ढगफुटी झाली. यात मंडी, राजधानी शिमला, सोलन, कांगडा-हमीरपूर, चंबा, सिरमौरमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मात्र, अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, किती लोकांचा जीव गेला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माहितीनुसार, राज्यात 751 मार्गांसह 4697 वीज ट्रान्सफॉर्मर आणि 902 पाणीपुरवठा योजना बंद आहेत. मंडी जिल्ह्यात सर्वाधिक 345 मार्ग, शिमला येथील 115 आणि हमीरपूरमधील 124 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मंडी जिल्ह्यात 2672 आणि शिमल्यात 348 इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. दरम्यान, राज्यात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला गेला असल्याची माहिती आयएमडीचे उपसंचालकांनी दिली आहे. यात चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी, सोलन, शिमला, सिरमौर आणि हमीरपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

मंदिरावर दरड कोसळली, अनेक जणांचा मृत्‍यू (Himachal Heavy Rain)

सिमला शहरातील समरहिल भागातील शिव मंदिरावर दरड कोसळून झालेल्‍या दुर्घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. ढीगार्‍याखाली 50 हून अधिक जण गाडले गेल्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. हिमाचल प्रदेशातील संततधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी सकाळी राजधानीत मोठी हानी केली. शहरात दरड कोसळल्याने आणि झाडे पडल्याने तेरा जणांचा मृत्यू झाला, तर पाचहून अधिक जण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

फागली येथील लाल कोठीजवळही हृदयद्रावक घटना घडली. येथेही सकाळच्या सुमारास एका निवारागृहांमध्ये राहणारे आठ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सकाळी 10.00 वाजेपर्यंत तीन जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तातडीने आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे पाच जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news