High Blood Pressure : तरूणांसाठी उच्च रक्‍तदाब घातकच; जाणून घ्‍या उपाय

High Blood Pressure
High Blood Pressure

लहान वयात, तरुणपणी उच्च रक्तदाबाचा विकार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. लक्षणे जाणवत नाहीत म्हणून डॉक्टरांकडे गेलो नाही, असे तरुणाई सांगते. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे अनेक तरुणांना विलंबाने लक्षात येते. ही डॉक्टरांची निरीक्षणे आहेत.

रक्तदाब किती असावा?

उच्च रक्तदाब म्हणजे शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब. धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यतः रक्तदाब 120/80 असतो. तो तसाच राखावा. 139/89, 140/90 पेक्षा जास्त रक्तदाब उच्च रक्तदाब.

काही कारणे…

बदलती जीवनशैली. काहीही न करण्याची मानसिकता. फास्टफूडचे अतिसेवन. सोशल मीडियाचे (समाजमाध्यम) व्यसन. आरोग्याबाबत अनास्था. व्यायामाचा अभाव. अनुवंशिक घटकांचा परिणाम

लक्षणे…

छातीत दुखणे. चक्कर येणे. चेहरा लाल होणे. धाप लागणे. अशक्तपणा जाणवणे. अस्पष्ट दृष्टी. थकवा. तणाव. हृदयाचे वाढलेले ठोके. अनियमित ठोके. डोकेदुखी आणि नाक वाहणे. तीव्र डोकेदुखी. हृदयात वेदना. श्वासास त्रास. मूत्रामध्ये रक्त येणे. भीती वाटणे. जास्त घाम. निद्रानाश. डोळ्यात रक्ताचे ठिपके आदी.

जीवनशैलीचा परिपाक

सांगलीतील हृदयरोगतज्ञ डॉ. रियाज मुजावर म्हणाले, काही वर्षात उच्च रक्तदाबाचे प्रमाण खूप वाढलेय. केवळ वयस्कर व्यक्तींमध्येच नव्हे तर सर्वच वयोगटात. व्यायामाचा अभाव, जेवणाच्या अनियमित वेळा, झोपेची वेळ न पाळणे, धूम्रपान याचाच म्हणजे बदललेल्या जीवनशैलीचा परिपाक. उच्च रक्तदाब हा हृदयविकाराला कारणीभूत. बर्‍याचदा या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे तपासणी केली जात नाही. परिणामी वेळेत निदान होत नाही. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात न आल्यास हृदयविकार, मेंदूचा पक्षाघात, किडनी निकामी होऊ शकते.

काय खाऊ नये…

नियमित हलका आहार घ्यावा. तळलेले, चमचमीत, तेलकट, तूपकट पदार्थ टाळावेत. पिझ्झा, बर्गर, वडा, डोसा, ऑम्लेट, डोनेट, आईस्क्रीम यांसारखे पदार्थ खाऊ नयेत. तेलकट, चमचमीत व पॅकबंद पदार्थांमुर्ळे ट्रान्सफॅट वाढतात. त्यामुळे असे पदार्थ टाळले तर कोलेस्ट्रॉल वाढीला अटकाव होतो.

हे करा…

तणावमुक्त राहा. आहार व्यवस्थापन करा. एरोबिक व्यायाम नियमित गरजेचा. वजन कमी करणे, धूम्रपान बंद करणे. अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन कमी करणे.

युवकांना आर्थिक स्थैर्य असल्याने कर्तृत्व सिध्द करण्याचे प्रयत्न करावेसे वाटत नाहीत. त्यामुळे दिशाहीन भवितव्य घेऊन ताण-तणावात जगतात. सोशल मीडियामुळे एकाकी राहतात. त्यांना अनामिक भीती वाटते. व्यायामाचा अभावही प्रमुख कारण.
– डॉ. अनिल मडके, हृदयरोग तज्ज्ञ, सांगली

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news