चेरापुुंजी : प्रत्येक जाती-धर्मात विवाह संपन्न झाल्यानंतर नवविवाहिता सासरी जाते, ही परंपराच आहे; पण भारतातच एक राज्य असेही आहे, जिथे नववधू सासरी जात नाही, तर ती माहेरीच राहते आणि तिचा नवविवाहित पती मात्र आपले घर सोडून तिच्या घरी राहायला जातो. ही अनोखी परंपरा मेघालयमधील एकाच समुदायात पाळली जाते. मेघालयातील चेरापुंजी भागात खासी जमातीच्या लोकांमध्ये ही प्रथा आहे.
चेरापुंजी परिसरात राहणार्या या खासी जमातीत विवाहानंतर मुलीऐवजी मुलगा घर सोडून मुलीकडे राहायला जातो; पण काही दिवसांनी तो आपले निवासस्थान बदलतो. या जमातीतील आणखी एका पुरातन परंपरेनुसार, सर्वात लहान मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहून त्यांची सेवा करते. मात्र, त्यापेक्षा मोठ्या मुली त्यांचे घर सोडून वेगळ्या होऊ शकतात.
या खासी जमातीतील एक खास गोष्ट म्हणजे येथे महिला घराच्या प्रमुख असतात. याशिवाय जेव्हा मालमत्तेची विभागणी होते तेव्हा मुलांना कमी आणि मुलींना जास्त वाटा मिळतो. यातही जास्तीत जास्त वाटा आई-वडिलांसोबत राहणार्या लहान मुलीला दिला जातो.