हेपेटायटिस व्हायला नको, तर जाणून घ्या यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस व्हायला नको, तर जाणून घ्या यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स
Published on
Updated on

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने वापरलेल्या सुईने घेतलेले इंजेक्शन याद्वारे पसरतो. इतकेच नाही, तर आईकडून तिच्या नवजात बाळातही हा आजार पसरतो. हेपेटायटिस विषाणू थेट यकृतावरच हल्ला करतो. त्यामुळे यकृताला सूज येते, म्हणूनच या आजाराला हेपेटायटिस असे नाव देण्यात आले आहे.

हेपेटायटिसचे प्रकार : हेपेटायटिसचे सहा प्रकार आहेत. ए, बी, सी, डी, ई आणि जी. यातील ए आणि बी हे जास्त आढळून येतात. ए आणि ई हे जास्त धोकादायक नाहीत; मात्र बी आणि सी हे खूप धोकादायक आहेत आणि त्यांना क्रॉनिक हेपेटायटिस म्हणजे दीर्घकाळ राहणारे हेपेटायटिस म्हणून ओळखले जाते. डी हा प्रकार बी बरोबर अ‍ॅक्टीव्ह असतो. हेपेटायटिस ए आणि बी साठी लस आहे; पण सी साठी नाही आणि हेपेटायटिस ई आणि जी अत्यंत विरळा आहेत.

हेपेटायटिसची लक्षणे : सांधेदुखी, पोटात दुखणे, उलट्या होणे, अशक्तपणा येणे, सतत थकल्यासारखे वाटणे, ताप येणे आणि लघवीचा रंग गडद होणे, भूक न लागणे, त्वचा पिवळी पाडणे, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे आणि लघवीचा रंगही पिवळा होणे.

एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, सर्वसामान्य ताप आणि हेपेटायटिसच्या लक्षणांत फरक असतो. उदाहरणार्थ, सामान्य तापात पोटात दुखणे, लघवीचा रंग पिवळा होणे ही लक्षणे दिसत नाहीत, तर हेपेटायटीसमध्ये ही लक्षणे हमखास असतात. अर्थात, अशी लक्षणे अन्य आजाराचीही असू शकतात. त्यामुळे ही लक्षणे दिसू लागल्यावर वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेपेटायटिसची चाचणी : रुग्णात वरील लक्षणे दिसत असतील, तर सर्वात प्रथम त्याची लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) केली जाते. यातून यकृत योग्यतर्‍हेने काम करत आहे की नाही, हे समजते. या चाचणीत यकृताचे काम बिघडले असल्याचे आढळून आले, तर हेपेटायटिस विषाणू आहे की नाही, याची तपासणी केली जाते.

हेपेटायटिस धोकादायक का? : हेपेटायटिस धोकादायक असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे याचा संसर्ग झाल्याचेच लवकर कळत नाही. अनेकवेळा लोकांना याचा संसर्ग झालेला असतो; पण त्यांना वर्ष, दोन वर्षे कळतच नाही. या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते.

हेपेटायटिस बी चे प्रकार : हेपेटायटीस बी चे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अक्यूट किंवा तीव्र हेपेटायटिस बी आणि दुसरा दीर्घकालीन किंवा क्रॉनिक हेपेटायटिस बी. पहिल्या प्रकारात हेपेटायटिसचा संसर्ग सहा महिन्यांपर्यंत राहू शकतो. हेपेटायटिस बी पॅनल टेस्ट केल्यावर अक्यूट हेपेटायटिस बी बद्दल कळून येते.

रुग्णाच्या रक्तात हेपेटायटिस बी चा विषाणू सहा महिन्यांहून अधिक काळ असेल, तर त्यावर क्रॉनिक हेपेटायटिस बीचे उपचार केले जातात. हा प्रकार जास्त धोकादायक आहे.

लस टोचून घेणे आवश्यक : हेपेटायटिस बी ची लस टोचून घेणे आवश्यक आहे. अर्थात, प्रौढ लोकांना ही लस टोचण्याची आवश्यकता नाही; पण डॉक्टर सर्वच लोकांना ही लस टोचून घेण्याचा सल्ला देतात.

एक वर्षापर्यंतच्या सर्व लहान मुलांना ही लस टोचणे आवश्यक आहे. ज्यांची किडनी खराब आहे आणि डायलिसीसवर आहेत, अशांनी ही लस टोचून घ्यावी. ज्यांना वारंवार रक्त बदलावे लागते.

  •  गरदोरपणात.
  •  शरीरावर गोंदून घेणारे
  • असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणारे
  • कुटुंबात कुणाला हेपेटायटिस बी झाला असेल, तर त्या कुटुंबातील इतरांनी.

मात्र, ज्यांनी ही लस पूर्वी टोचून घेतली असेल, त्यांनी पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे गरोदरपणात हा आजार होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, आईला जर हेपेटायटिस बी झाला, तर त्याचा संसर्ग होणार्‍या बाळालाही होऊ शकतो. आईला आधीपासूनच हेपेटायटिस बी असेल, तर त्याबद्दल डॉक्टरांना सांगण्याची आवश्यकता आहे. ज्या महिलांनी हेपेटायटिस बीची लस टोचून घेतली आहे, अशा महिलांनीही गरोदरपणात याबाबत तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बाळ जन्माला आल्यावर त्याला ही लस टोचून त्याचे या आजारापासून रक्षण करता येते.

यकृताची काळजी घ्या.

हेपेटायटिस बी व्हायचा नसेल, तर तुमचे यकृत तंदुरुस्त राहण्याची आवश्यकता आहे. यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स-

  • सकाळी एक ग्लास कोमट पाणी आणि दिवसभरात कमीत कमी दोन लिटर कोमट किंवा सामान्य स्वच्छ पाणी प्या.
  •  मद्यपान करू नका. डॉक्टरना न विचारता औषधे घेऊ नका.
  •  लिंबू, ग्रीन टी, फळांचा रस प्या.
  •  सात किंवा पंधरा दिवसांतून एक दिवस उपवास करा आणि त्या दिवशी फक्त फळांचा रस प्या. त्यामुळे यकृताला लाभ होईल.
  • प्रक्रिया केलेले अन्न, ज्यात मोठ्या प्रमाणावर प्रिजर्व्हेटिव, फॅटस् आणि कोलेस्ट्रॉल असते. खाऊ नका. म्हणजे फास्ट फूड, खूप तळलेले पदार्थ वगैरे.
  •  पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
  •  लसूण आणि आक्रोडचे सेवन करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news