पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. सोरेन यांच्या काकांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने आज (दि.२७) सुनावणीवेळी त्यांची मागणी फेटाळून, हेमंत सोरेन यांना मोठा झटका दिला आहे. (Hemant Soren)
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे १३ दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. यावर आज (दि.२७) रांचीच्या विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. (Hemant Soren)
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चा प्रमुख शिबू सोरेन यांचे भाऊ राम सोरेन यांचे शनिवारी (दि.२७) सकाळी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. ते रांचीमध्येच राहत होते, असे माध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. माजी मुख्यमंत्री सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी हायकोर्टाने ईडीला सोरेनच्या जामीन याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी एका आठवड्याची मुदत दिली आहे.