पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि. २६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. 3 मे पर्यंत ही प्रक्रीया चालणार आहे. आज पहिल्याच दिवशी छगन भुजबळ यांचे समर्थक दिलीप खैरे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यापाठोपाठ आता नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महायुतीत नाशिकच्या जागेवरील तिढा अद्याप कायम असून उमेदवार ठरलेला नाही. तरी महायुतीच्या नेत्यांकडून अर्ज घेतले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली मात्र तरीही महायुतीचा तिढा अद्याप कायम आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अशा तिनही पक्षांकडून या जागेसाठी दावा करण्यात येतो आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे जाहीर उमेदार राजाभाऊ वाजे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हापासून गोडसे या रेसमध्ये आले. त्यानंतर त्यांच्या नावाला राष्ट्रवादी व भाजप दोनही पक्षातून विरोध झाला. व छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले. मात्र, भुजबळांनी या निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केल्याने पुन्हा हेमंत गोडसे यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्याआधी व त्यानंतरही अनेकदा त्यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्या. मात्र, अद्यापही महायुतीतील या जागेवरुन संघर्ष कायम असून उमेदवारी कुणाला मिळते हे पाहावे लागणार आहे.