‘मराठी सिनेमाला एका शो साठी झगडावं लागत असेल तर’……..हेमंत ढोमे कडाडला

‘मराठी सिनेमाला एका शो साठी झगडावं लागत असेल तर’……..हेमंत ढोमे कडाडला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोविडनंतर सिनेसृष्टी पुन्हा एकदा जोमाने कार्यरत झाली आहे. मराठी सिनेमाही यात मागे नाही. नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळे आणि मनोरंजक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण भारंभार सिनेमे रिलीज झाल्यानंतर स्क्रीनचं युद्ध पुन्हा सुरू झालं आहे.

मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नाहीत अशा आशयाच्या चर्चा नेहमीच होताना दिसते आहे. पण या वादात आता हेमंत ढोमेनेही उडी घेतली आहे. हेमंत ढोमेने ट्वीट करत याबाबतचा संताप व्यक्त केला आहे. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला 'सनी' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

घरापासून लांब असलेल्या मुलाची गोष्ट सनी या सिनेमात आहे. अभिनेता ललित प्रभाकर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसतो आहे. 18 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज झाला आहे. पण या दरम्यान हेमंतने महत्त्वाच्या मुद्द्यावर अगदी सडेतोड ट्वीट केलं आहे.

सनी या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळूनही त्यांचे काही शो रद्द झाले आहेत. शो कॅन्सल झाल्याचे काही स्क्रीनशॉट त्याने शेयर केले आहेत. यासोबतच्या खरमरीत शब्दातल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ' पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत! मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच!'

हेमंतने यापूर्वीही अनेकदा सामाजिक विषयांवर परखड मत व्यक्त केलं आहे. मराठी सिनेमाना स्क्रीन मिळत नसल्याचा यापूर्वीही अनेक सिनेमाना फटका बसला आहे. आताही दृश्यममुळे गोदावरी आणि सिनेमाला कमी स्क्रीन मिळत असल्याची चर्चा आहे. हेमंतच्या ट्वीटवर अनेकांनी सहमती दर्शवत मराठी सिनेमाबाबत थिएटर्सचं धोरण बदलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news