पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 'मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे' या विनोदी शो द्वारे तुमच्या वीकएंडला हास्याचा फवारा घेऊन येत आहे. या रविवारी शो मध्ये अरबाज खान आणि सोहेल खान यांचे स्वागत केले जाईल, जे आपल्या 'मॅडनेस की मालकिन' हुमा कुरेशीसोबत सहभागी होतील.
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि शोचा होस्ट, हर्ष गुजराल, याने मोठ्या भावंडांसोबत राहण्यासाठी काय काय करावे लागते हे अधोरेखित करणारा अॅक्ट सादर केला आणि भावंडांसोबत येणार्या गंमतीजमती विनोदी ढंगाने सादर करून सेलिब्रिटी पाहुण्यांना भरपूर हसवले. विनोदी कलाकार हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके यांनी आपल्या 'सायलेंट बायको' या स्किट द्वारे वैवाहिक जीवनातील चढ-उतार विनोदी रीतीने प्रस्तुत केले.
हेमांगी कवी म्हणते, "मॅडनेस मचाएंगे-इंडिया को हसाएंगे!' मध्ये सहभागी होणे हा एक आनंद आहे आणि अशा उत्कृष्ट विनोदवीरांसोबत काम करणे म्हणजे उत्कंठा आणि सर्जनशीलतेच्या अनुभवाला एक अतिरिक्त पदर जोडणे आहे. कुशल बद्रिके सोबत विनोदी स्किट करणे म्हणजे हास्याची दंगलच होती. पती-पत्नीच्या दैनंदिन जीवनातील विनोद आणि त्यातली धमाल प्रस्तुत करण्यात आम्हाला इतकी मजा आली की आम्ही एकत्र केलेला वेडेपणा आणि धमाल प्रेक्षक कधी पाहतात असे मला झाले आहे."
कुशल बद्रिके म्हणाला, "मॅडनेस मचाएंगेच्या लाँचिंगच्या माध्यमातून तुमच्या टीव्हीच्या पडद्यावर कॉमेडी पुन्हा परतली आहे. ही एक अद्वितीय संकल्पना असून त्यात प्रत्येकासाठी काही ना काही तरी आहे. प्रेक्षकांना निखळ हास्याच्या धबधब्यात डुंबवत इतर कॉमेडियन्ससोबत काम करण्याच्या संधीकडे मी मोठ्या आशेने पाहत आहे."
'मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे' या रविवारी रात्री साडे नऊ वाजता पाहता येईल.