Sushma andhare | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले

Sushma andhare | ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले

महाड : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी महाडमध्ये कोसळले. दरम्यान, सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या.

सुषमा अंधारे महाडमधून बारामतीमध्ये प्रचार सभेसाठी जाणार होत्या. त्यासाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते. अंधारे हेलिपॅडवर पोहोचल्या होत्या. याचदरम्यान हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मी आणि माझा भाऊ हेलिकॉप्टरने जाणार होतो. त्यासाठी आम्ही हेलिपॅडवर आलो होतो. हेलिकॉप्टर घिरट्या घालत असताना ते अचानक कोसळले. सुदैवाने, आम्हाला काहीही झालेले नसून आम्ही सुखरूप असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे काल गुरुवार २ मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसाठी महाड येथे आल्या होत्या. आज सकाळी ९ वाजता त्यांना पुढील प्रचार दौऱ्यासाठी बारामती येथे जायचे होते. याकरिता त्यांनी महालक्ष्मी इव्हिगेशन पुणे यांचे हेलिकॉप्टर निश्चित केले होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास हेलिकॉप्टर महाड येथे येणे अपेक्षित होते. मात्र, त्याला यायला विलंब झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी संपर्क करून याबाबतची खात्री केली असता ९ नंतर हेलिकॉप्टर महाड शहरातील एका खासगी मैदानावर येत असल्याचे त्यांना कळाले. पण हेलिकॉप्टर मैदानावर खाली उतरत असताना कोसळले. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या हेलिकॉप्टरचे पायलट नितीन वेल्डे हे सुरक्षित असून सुषमा अंधारे या त्यावेळी हेलिपॅडजवळील गाडीमध्ये बसल्या होत्या.

या संदर्भात त्यांनी हेलिकॉप्टरच्या संदर्भातील सर्व आवश्यक असलेल्या शासकीय परवानगी घेतल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनामार्फत चौकशी केली जाण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news