पळसदेव : हेलिकॉप्टर मासे मच्छीमारांच्या मुळावर ! अंगावरील काट्यांमुळे जाळे फाटून बसतोय फटका

पळसदेव : हेलिकॉप्टर मासे मच्छीमारांच्या मुळावर ! अंगावरील काट्यांमुळे जाळे फाटून बसतोय फटका
Published on
Updated on

प्रवीण नगरे

पळसदेव : नेहमी अत्यल्प प्रमाणात उजनी जलाशयात आढळणारा 'हेलिकॉप्टर' मासा यंदा तुलनेने जास्त प्रमाणात आढळत आहे. मात्र, त्याच्या अंगाला मोठ्या प्रमाणात काटे असल्याने त्याला जाळ्यातून काढताना जाळी फाटून मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा मासा मच्छीमारांच्या मुळावर आला आहे. शरीरावर सुरेख व आकर्षक नक्षीदार खवले असलेल्या या माशाला स्थानिक लोक 'हेलिकॉप्टर' व 'खरपा' मासा या नावानेही ओळखतात.

उजनी जलाशयातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सध्या मच्छीमारांच्या जाळीत हे मासे मुबलक प्रमाणात सापडत आहेत. अंगाला सर्वत्र काटे असल्याने तो जाळीतून सहजासहजी निघत नसल्याने त्याला जाळी फाडून काढावे लागते, यामुळे जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागल्याने मच्छीमार त्रस्त झाले आहेत. खाण्यास अयोग्य व विषारी असलेला या माशाला बाजारातही मागणी नसते. तरीही सामान्यपणे 15 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी घेतात. मासळीखतासाठी या माशांचा उपयोग केला जातो.

खरपा माशाची वैशिष्ट्ये
पोहण्यासाठी असलेले सर्व पर हे पंख्याच्या पात्याप्रमाणे विकसित झालेले असून, त्यात टोकदार काटे असतात. पाठीवरील पर हे होडीला बांधलेल्या शिडासारखे असते, म्हणून इंग्रजीत या माशाला 'सेलफिन फिश' असे नाव आहे. काटेरी पर व शरीरावरील खवले हे विषारी असून, त्यांच्या स्पर्शाने सूज येते. शरीरात फुफ्फुसासारख्या हवेच्या पिशव्या असल्यामुळे तो पाण्याबाहेर तासभर जिवंत राहू शकतो. तोंड गोलाकार असून, त्याच्या कडा चिकट द्रवाचा स्त्राव करणार्‍या ग्रंथींनी भरलेल्या असतात. शेवाळ, इतर छोटे मासे व माशांची अंडी हे या माशांचे प्रमुख खाद्य आहे. या माशांना पाण्याच्या तळाशी असलेल्या चिखलात राहायला आवडते.

टेरिगेप्लिथिस मल्टीरेडिएटा' असे शास्त्रीय नाव असलेला हा मासा कॅटफिश या गटात मोडतो. यंदा अतिवृष्टीमुळे उजनी जलाशयात पाण्याची मोठी आवक झाली. परिणामी, वर्षानुवर्षे साठवून राहिलेल्या मृत साठ्याच्या ठिकाणी नवीन पाणी आल्यामुळे सर्वच प्रकारच्या माशांना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे खरपा मासेही विपुल प्रमाणात वाढले आहेत.
                                   डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र अभ्यासक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news