पुढील 48 तास मुसळधार; कोल्‍हापूरला ‘ऑरेंज अलर्ट’, कोकणात अतिवृष्‍टीचा इशारा

पुढील 48 तास मुसळधार; कोल्‍हापूरला ‘ऑरेंज अलर्ट’, कोकणात अतिवृष्‍टीचा इशारा
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कोकण ते गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. कोकणात अतिवृष्टी, तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्याला 'ऑरेंज अलर्ट', तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' पुकारण्यात आला आहे.

अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. प्रामुख्याने कोकण, गोवा, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार आहे. रत्नागिरीपासून कर्नाटकातील होनावळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला आहे. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी मुसळधार पाऊस होईल, असे वेधशाळेने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट', तर पुणे, सांगली, सातारा या भागासह विदर्भातील सर्वच भागांत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे

राज्यातून 5 ऑक्टोबरपासून उत्तर महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यावर बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. त्यातही कोकण व मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी सांगितले.

कोल्हापुरात दिवसभर रिपरिप

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, कोल्हापुरात गेल्या 24 तासांत 8.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. कमाल तापमानात 4 अंशांची घसरण होऊन पारा 26.1 अंशांवर स्थिरावला होता, तर किमान तापमान 21 अंशांवर होते. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळपासूनच सुरू झालेला पाऊस कमी-अधिक फरकाने बरसत होता. यामुळे नागरिक छत्री, टोपी, रेनकोट घालूनच प्रवास करत होते. शुक्रवारी पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये असणार्‍या कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव— कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. हे तीव— कमी दाबाचे क्षेत्र रत्नागिरीपासून 130 कि.मी. अंतरावर असून, ते पूर्व इशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूरसह पश्चिम मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप सुरू असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

उद्या कोल्हापूरला यलो अलर्ट

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. पावसाच्या मोठ्या सरी कोसळण्याचा अंदाज होता; मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रविवारी कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 19.2 मि.मी. इतका पाऊस चंदगड तालुक्यात झाला असून, रूई बंधारा अद्याप पाण्याखाली आहे. पुढील चार दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news