पुणे: वरसगाव-मुठा खोर्‍यात पावसाने केला कहर

file photo
file photo

खडकवासला : वरसगाव, मुठासह पानशेत खोर्‍यात पावसाचा कहर सुरू आहे. ओढे, नद्यांना पूर आल्याने आज मंगळवारी (दि.12) सकाळपासून शंभर टक्के भरलेल्या खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. वरसगाव, पानशेत व टेमघर धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ सुरू आहे. गेल्या 24 तासांत साखळीत दोन अब्ज घनफूट (टीएमसी) पेक्षा अधिक पाण्याची भर पडली. आतापर्यंत जवळपास अर्धा टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.

खडकवासला धरण साखळीत सायंकाळी पाच वाजता 11.57 टीएमसी (39.69 टक्के) साठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तीन टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या दिवशी 11 जुलै 2021 रोजी धरण साखळीत 8.62 टीएमसी (29.56 टक्के) साठा होता.
पानशेत, वरसगाव, टेमघर धरणे अद्याप पन्नास टक्केही भरली नाहीत. खडकवासलाच्या पाणलोट क्षेत्रातील मुठा नदीसह सिंहगड, आंबी, सोनापूर, मालखेड, खामगाव मावळ, रांजणे निगडे, ओसाडे , कुडजे, मांडवी, कातवडी आदी ठिकाणच्या ओढ्यांना पूर आले आहेत . त्यामुळे खडकवासलातील पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

अतिवृष्टीचा कहर झाला असून, आज सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 100, पानशेत येथे 40, वरसगाव 36 व खडकवासला येथे 24 मिलिमीटर पाऊस पडला. काल सकाळी सहा ते आज सकाळी सहा वाजेपर्यंतच्या 24 तासांत टेमघर येथे 170, पानशेत येथे 141, वरसगाव येथे 137 व खडकवासला येथे 60 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला 100 टक्के पाणीसाठा असून, वरसगाव धरणात 35.91 टक्के, पानशेतमध्ये 38.30 टक्के व टेमघर मध्ये 24.61 टक्के साठा आज सायंकाळी पाच वाजता झाला होता.

पुणे-पानशेत रस्ता खचला

लागोपाठ तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या थैमानाने नद्या, ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. पानशेत-वरसगाव धरण खोर्‍यातील जनजीवन ठप्प पडले आहे. पानशेत परिसराला जोडणारा खडकवासला धरणाच्या तीरावरील मुख्य पुणे-पानशेत रस्ता सोनापूरजवळ खचला आहे. धरण तुडुंब भरल्याने पाण्याच्या लाटा आदळून रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्ता वाहून जाऊन वाहतूक बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news