नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी ही लांबणीवर पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता या प्रकरणावरील सुनावणीसाठी बुधवारी (दि.७) घटनापीठ स्थापन करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेसंदर्भात शिंदे गटाने रिट याचिका दाखल करताच सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उद्या घटनापीठाची स्थापना केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणावर ५ न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना पक्ष कुणाचा ? हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगात यासंबंधी सुरू असलेल्या सुनावणीवर स्थगिती देवू नये, अशी विनंती करीत शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आगामी महानगर पालिका निवडणुका तसेच अंधेरी(पुर्व) विधानसभा मतदारासंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने वेगाने हालचाली सुरू केल्याचे त्यामुळे दिसून येत आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर पुढील सुनावणीत न्यायालयाकडून विचार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ सुनावणी घ्यावी तसेच पक्षाच्या निवडणूक चिन्हासंबंधी आयोगाच्या प्रक्रियेसंदर्भात निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिकेतून शिंदे गटाने केली आहे. यापूर्वी न्यायालयाने उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी दरम्यान कुठलाही निर्णय घेवू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाला देत प्रक्रियेला स्थगिती दिली होती. आता या वादावर घटनापीठासमक्ष सुनावणी होणार आहे. पंरतु, ही सुनावणी कधी होईल? यासंबंधी अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता शिंदे गटाच्या रिट याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का ?