पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रसह इतर पाच राज्यांना खबरदारी घेण्यासंदर्भात पत्र पाठवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत मोठं विधान केले आहे.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, मी राज्यातील कोरोनाच्या (कोविड19) परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेत आहे. नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण कोरोना केसेसमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच आम्ही वय 12-15 आणि वय 15-18 या वयोगटातील व्यक्तींना सध्या लसीकरण करत आहे. परिस्थितीला घाबरून न जाता, काळजी घ्यावी. सध्या तरी महाराष्ट्रात मास्क सक्ती केली जाणार नसल्याचे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.