महायुती, ‘मविआ’चे ठरले; शेट्टींचे ‘एकला चलो रे’

महायुती, ‘मविआ’चे ठरले; शेट्टींचे ‘एकला चलो रे’

जयसिंगपूर : हातकणंगलेे लोकसभेसाठी शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे खासदार धैर्यशील माने यांना, तर माजी आमदार उल्हास पाटील, काँग्रेसचे नेते गणतपराव पाटील यांना महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांच्याबरोबर राहावे लागणार आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना 'एकला चलो रे' हा नारा द्यावा लागणार आहे. महाविकास आघाडीने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. गत निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांना पराभूत करून शिवसेनेकडून धैर्यशील माने खासदार झाले होते. सध्या खासदार माने यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली असून, शिरोळ तालुक्यातून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाचे बळ माने यांना मिळणार आहे.

 दुसरीकडे राजू शेट्टी यांनी सहा महिन्यांपासून स्वाभिमानी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेचा पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक चर्चेनंतर कोणताच तोडगा पडला नाही. अखेर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे राजू शेट्टी यांच्या चर्चेचे दोर कापले आहेत. शिरोळ तालुक्यात शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील कार्यकर्ते यांचे बळ सत्यजित पाटील यांना मिळणार आहे.

 गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 1 लाख 20 हजार मते घेतली होती. सध्याही 'वंचित'ने डी. सी. पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हातकणंगलेच्या मैदानात आता चार उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे महायुतीचे धैर्यशील माने यांच्याबरोबर भाजप व शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी, तर मविआचे सत्यजित पाटील यांना शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसची साथ मिळणार आहे.

मत विभागणीचा फटका कोणाला?

राजू शेट्टी हे शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यांतील गावागावांत संपर्क ठेवून दौरे करीत आहेत. अशातच आता शाहूवाडी तालुक्यातील माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक उमेदवाराला दोन तालुक्यांचे पाठबळ मिळेल, अशी शक्यता आहे. खासदार धैर्यशील माने यांच्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह पदाधिकार्‍यांनी शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, पन्हाळा-शाहूवाडी याठिकाणी जोर लावला आहे. शिराळा व वाळवा तालुक्यांत आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व असल्याने होणार्‍या मत विभागणीचा फटका कोणाला बसणार, यांचे मात्र गणित नेत्यांना घालावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news