‘उमेदवारीचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल’ : हर्षवर्धन पाटील

‘उमेदवारीचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल’ : हर्षवर्धन पाटील

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये येण्याचा अजित पवार यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. लोकसभा व विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल, असे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इंदापूर येथे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा रविवारी (दि. 9) पार पडला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

अजित पवार यांच्या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून भाजप-शिवसेना महायुतीचे 45 हून अधिक खासदार निवडून येतील, असेही पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-भाजप युतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीचे सरकार अधिकचे गतिमान होणार आहे.

पाटील म्हणाले, लाकडी-निंबोडी पाणी योजना मार्गी लावणे खडकवासला ते लोणी काळभोर कालव्याऐवजी आता बोगदा केला जाणार आहे. त्यामुळे वाढीव पाणी हे दौंड, इंदापूर तालुक्यांना मिळणार आहे. मुळशी धरणाचे पाणी दौंड, इंदापूर तालुक्यांना मिळण्यासाठी शासनस्तरावर अहवाल तयार केला जात आहे. इंदापूर शहरात वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

निरा नदीवरील सर्व बंधार्‍यांची पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. उजनी जलाशयाच्या प्रदूषणाचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात अनेक नवीन वीज रोहित्रे मंजूर केली आहेत. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शरद जामदार यांनी केले. या वेळी बाबा महाराज खारतोडे यांना तालुका भाजपच्या प्रवक्तेपदी निवडीचे पत्र देण्यात आले. सूत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी आभार मानले.

दोन्ही कारखान्यांना केंद्राची मदत मिळाली

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास 150 कोटी व निरा-भीमा कारखान्यास 75 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची रक्कम केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम तातडीने दोन्हीं कारखान्यांच्या बँक खात्यात वर्ग होईल. त्यामुळे दोन्हीं कारखाने सुस्थितीत येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news