पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल येथे रेशन घोटाळ्यातील आरोपी शहाजहान शेख याच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग ब्युरो (सीबीआय) कडे वर्ग करण्याचा आदेश आज (दि. ५ मार्च) कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिला. तसेच बहुचर्चित संदेशखालीतील महिला लौंगिक अत्याचार आणि जमीन हडप प्रकरणातील आरोपी व तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शहाजहान शेख याचा ताबा आज दुपारी 4.30 वाजेपर्यंत सीबीआयकडे सोपवण्यास यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकार या आदेशाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवग्ननम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने सांगितले की, सीबीआय 5 जानेवारी रोजी संदेशखाली येथे अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित प्रकरणाचा ताबा घेईल. खंडपीठाने राज्य पोलिसांच्या सदस्यांसह विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा पूर्वीचा आदेशही बाजूला ठेवला.
५ जानेवारी रोजी संदेशखळी येथे त्यांच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याने अंमलबजावणी संचालनालयाचे कर्मचारी जखमी झाले होते. कोट्यवधी रुपयांच्या कथित रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीचे अधिकारी शेख शाहजहानच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेले असता हा हल्ला झाला. ५५ दिवसांहून अधिक काळ फरार असलेला शहाजहान शेख याला पश्चिम बंगाल पोलिांनी २९ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. यानंतर तृणमूल काँग्रेसने त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले.संदेशखाली येथील अनेक महिलांनी लैंगिक छळ आणि जमीन हडप केल्याचा आरोप शहाजहान शेख आणि त्याच्या साथीदारांवर आहे.
शेख शाहजहान याने अल्पवधीत तृणमूलमध्ये आपली स्वतंत्र ओळख बनवली. पक्षात आमदार आणि मंत्र्यांपेक्षाही त्याचे राजकीय 'वजन' मोठे होते. ५ जानेवारी २०२४ रोजी त्याच्या घराची झडती घेण्यासाठी ईडीच्या अधिकार्यांनी त्याच्या घरावर छापा टाकला. तेव्हा त्याच्या ८०० ते हजार समथंकांनी ईडी पथकावर हल्ला केला होता. यामध्ये तीन अधिकारी जखमी झाले होता. तेव्हापासून शेख शाहजहान हा फरार होता. त्यानेच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप झाला आहे.
संदेशखाली गावात काही महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार तसेच गरिबांची जमीन बळकावण्याचे प्रकार झाल्याचा तक्रार शाहजहान शेखविरोधात दाखल झाल्या . यानंतर सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. शाहजहान शेखच्या अटकेच्या मागणीसाठी गावकरी, बहुतेक महिलांनी रस्त्यावर उतरले. या प्रकरणी दाखल याचिकांवरील कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली . यावेळी न्यायालयाने आरोपीवर कारवाईस झालेल्या दिरंगाईबाबत सरकारला फटकारले होते. या प्रकरणी चार वर्षांपूर्वी राज्य पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार वर्षे कशी लागली, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केली होती.