इस्रायलवर हमासचा हल्ला; युद्ध पेटले!

इस्रायलवर हमासचा हल्ला; युद्ध पेटले!

जेरुसलेम ; वृत्तसंस्था : हमास संघटनेने इस्रायलवर शनिवारी सात हजार क्षेपणास्त्रे डागल्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध पेटले आहे. या रक्तरंजित संघर्षात 40 जवानांसह 100 इस्रायली नागरिक मारले गेले. इस्रायलने या हल्ल्याला युद्ध घोषित करीत गाझा पट्टीचा भाग हवाई दलाची विमाने आणि क्षेपणास्त्रांच्या मार्‍याने अक्षरशः भाजून काढला. त्यात 198 पॅलेस्टिनी मरण पावले. या दोन्ही घटनांत दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र मार्‍यासोबतच गाझा पट्टीचे कुंपण तोडत हमासच्या शेकडो दहशतवाद्यांनी इस्रायली शहरांत प्रवेश करीत 54 जवान व नागरिकांना ताब्यात घेत गाझा पट्टीत नेले आहे.

शनिवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार साडेसहाच्या सुमारास गाझा पट्टीतून हमासने इस्रायलच्या विविध शहरांवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. सुक्कोत या ज्यूंच्या सणाची सुट्टी असल्याने इस्रायल निवांत असतानाच हे हल्ले झाले. हमासने शनिवारच्या हल्ल्यांत जवळपास 20 इस्रायली शहरे व गावांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला.

काही ठिकाणी इस्रायली लष्कराच्या तळांवर निवडून हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. अश्केलॉन आणि सिद्रोत या गाझा पट्टीच्या जवळ असणार्‍या शहरांत झालेल्या हल्ल्यांत प्रचंड नुकसान झाले. शहरात जागोजागी धुरांचे व आगींचे लोळ उठले होते. तेल अवीव शहरही या हल्ल्यात होरपळले. सर्वात मोठा फटका बसला तो अश्केलॉन शहराला. तेथे रहिवासी भागांत काही क्षेपणास्त्रे कोसळली. डझनावारी वाहनांना या स्फोटांत आगी लागल्या तर अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. याच शहरापासून 70 कि.मी.वर असलेल्या तेल अवीववरही किमान 20 क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याचे सांगण्यात आले.

एकीकडे क्षेपणास्त्र हल्ला सुरू झाल्यावर हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीच्या सीमेवर हल्ला चढवला. सीमेवरील इस्रायली सैन्यावर हल्ला चढवत कुंपण तोडण्यात ते यशस्वी झाले. शेकडो हमास दहशतवादी नंतर इस्रायली ताब्यातील गावांवर चाल करून गेले. वाटेत त्यांनी इस्रायली लष्कराच्या काही रणगाड्यांवर हल्ले चढवत ते ताब्यात घेतले. गावांत शिरलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली जवानांना आणि नागरिकांना ताब्यात घेतले. अशा 54 जणांना ताब्यात घेत दहशतवादी पुन्हा गाझा पट्टीत पसार झाले. हमासने गाझापट्टीशिवाय समुद्र किनार्‍यावरूनही क्षेपणास्त्रे डागली.

पॅराग्लायडर्सचा वापर

गाझा पट्टीच्या काही भागांत हमासच्या दहशतवाद्यांनी मोटराईज्ड पॅराग्लायडरचा वापर करीत चक्क कुंपणावरून उडत जात इस्रायली ताब्यातील भागात उतरून हल्ला चढवला. अंदाधुंद गोळीबारात अनेक जण जखमी झाले. दुसरीकडे गाझाच्या समुद्र किनार्‍यावरूनही इस्रायली भूभागाच्या दिशेने क्षेपणास्त्रे सोडण्यात आली. एकाचवेळी समुद्र, आकाश आणि जमिनीवरून हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हमासचा दावा

हमासच्या प्रवक्त्याने अल जझीरा वाहिनीला दूरध्वनीवरून या हल्ल्याच्या मागे आपली संघटनाच असल्याचे म्हटले आहे. अल अक्सा मशिदीत ज्यूंकडून अतिक्रमण होत असून त्याचा बदला म्हणून ऑपरेशन अल अक्सा फ्लड हाती घेत सात हजार क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा त्यांनी केला. तसेच वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांसह 54 इस्रायली आपल्या ताब्यात असल्याचे या प्रवक्त्याने म्हटले आहे.

इस्रायलाचा दावा

इस्रायलच्या संरक्षण खात्याने दोन हजार क्षेपणास्त्रे हमासने डागल्याचे सांगताना त्यात 40 इस्रायली जवानांसह 100 इस्रायली नागरिक ठार झाले व 700 हून अधिक जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यांत शेकडोजण जखमी झाले असून सारी रुग्णालये तुडुंब भरली असल्याचे विविध वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

इस्रायलचे प्रत्युत्तर

अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी हमासविरोधी युद्ध पुकारण्याची घोषणा करीत कल्पनाही करता येणार नाही एवढी किंमत हमासला मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला. सोबतच इस्रायलच्या नौदलाने समुद्रमार्गे हल्ला चढवणार्‍या हमासच्या दहशतवाद्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. याशिवाय गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ले चढवले. रामल्ला आणि गाझा पट्टीतील इतर शहरांत निवासी भागांवरही जोरदार हल्ला चढवण्यात आला. अनेक बहुमजली इमारती या हल्ल्यात भुईसपाट झाल्या. त्यात आतापर्यंत 198 पॅलेस्टिनी मारले गेले. तर 1610 जण जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत इस्रायलची क्षेपणास्त्रे व लढाऊ विमाने आग ओकत होती.

इतर संघटनांचा हमासला पाठिंबा

हमासच्या या हल्ल्यानंतर पॅलेस्टिनींच्या इतर संघटनाही सरसावल्या आहे. लेबनॉननमधील हिजबुल्लाह संघटनेने या हल्ल्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करीत जगातील सर्व अरब देशांनी हमासच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. इराण समर्थित इस्लामिक जिहादी संघटनेनेही हमासच्या या लढ्यात आपण उतरत असल्याचे जाहीर केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news