दहशतवाद : हाफिज सईदची घातक खेळी

दहशतवाद : हाफिज सईदची घातक खेळी

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दीड दशकांहून अधिक काळ उलटून गेला तरी अद्यापही या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला पाकिस्तानातून भारतात आणण्यात आपल्याला यश आलेले नाही. भारताकडून अनेकदा मागणी करूनही पाकिस्तान त्याला प्रतिसाद देत नाही. सध्या तुरुंगात असलेला हाफिज सईद आपल्या समर्थकांकरवी राजकीय पक्ष काढून पाकिस्तानातील आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार आहे.

सव्वीस नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला गतवर्षी दीड दशक पूर्ण झाले. या हल्ल्यातील पकडण्यात आलेल्या अजमल कसाब या दहशतवाद्याला भारतीय न्यायव्यवस्थेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आणि त्यानुसार 21 नोव्हेंबर 2012 रोजी त्याला फासावर लटकवण्यातही आले. अजमल कसाबने दिलेल्या माहितीतून या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे पूर्णपणाने स्पष्ट झाले होते. लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. काश्मीरमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यांबाबत आणि मनी लाँड्रिंगसारख्या अनेक गुन्ह्यांबाबत त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. असे असूनही पाकिस्तानी लष्कराच्या कृपेने तो अनेक वर्षे उजळमाथ्याने फिरत राहिला.

भारताने त्याला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करूनही पाकिस्तानने या मागणीला कधीच फारसे महत्त्व दिले नाही. आताही भारत सरकारने पुन्हा एकदा हाफिजच्या प्रत्यार्पणाची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. भारतामध्ये आणून त्याच्यावर खटला चालवायचा आहे. पण परराष्ट्र मंत्रालयाच्या विनंतीवर पाकिस्तानकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र पाकिस्तानी पत्रकार एजाज सय्यद यांच्या ट्विटनुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानला भारताकडून विनंती प्राप्त झाली आहे. पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही द्विपक्षीय प्रत्यार्पण करार अस्तित्वात नाही. थोडक्यात, याही वेळी भारताच्या या मागणीला पाकिस्तान केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

वास्तविक पाहता, हाफिज सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हाफिज सईद 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी अफगाणिस्तानात गेला होता. तेथे तो ओसामा बिन लादेनचा गुरू अब्दुल्ला अज्जम आणि इतर अफगाण सैनिकांना भेटला. 1990 च्या दशकात त्याने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या वेबसाईटनुसार, लष्कर-ए-तोयबाने 1993 पासून भारतीय लष्करावर आणि नागरिकांवर अनेक हल्ले केले आहेत. जुलै 2006 मध्ये मुंबईतील अनेक लोकल ट्रेनवर झालेल्या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे.

डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यामागेही याच संघटनेचा हात होता. याशिवाय ऑक्टोबर 2005 मध्ये नवी दिल्ली आणि डिसेंबर 2005 मध्ये बंगळुरू येथे झालेल्या हल्ल्यांमागेही लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे मानले जाते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यात तीन अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. असे असताना अनेकवेळा अटक करून सोडण्यात आलेल्या हाफिज सईदने दहशतवादाशी कोणताही संबंध असल्याचा इन्कार केला आहे. जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबा यांच्यातील संबंधांचाही त्याने इन्कार केला आहे. जुलै 2019 मध्ये सईदला टेरर फंडिंग प्रकरणात पाकिस्तानात अटक करण्यात आली होती.

एप्रिल 2022 मध्ये टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणात 32 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. अर्थात, ही कारवाई केवळ जगाची दिशाभूल करण्यासाठी होती. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीत समाविष्ट होऊ नये म्हणून पाकिस्तानने ही अटक केली होती. हाफिज सईद 2019 पासून तुरुंगात आहे. पण हा तुरुंगवास केवळ नावापुरता आहे. कारण तुरुंगात असतानाही तो इतका सक्रिय आहे, की त्याच्या इशार्‍यावर त्याचे समर्थक पक्ष काढताहेत आणि निवडणूक लढवताहेत. यावरून त्याचा तुरुंगवास म्हणजे पाकिस्तानने रचलेले एक ढोंग असून या माध्यमातून पाक पूर्णतः जगाची दिशाभूल करत आहे. ही दिशाभूल पाकिस्तानी लष्कराच्या धोरणांनुसार सुरू आहे. पाकिस्तानात लोकशाही ही नावापुरती आहे. प्रत्यक्षात निवडणुकांच्या माध्यमातून निवडून येणारे लोकप्रतिनिधीच नव्हे, तर अगदी पंतप्रधानदेखील लष्कराच्या हातचे बाहुले असतात. नवाझ शरीफ असोत वा इम्रान खान असोत किंवा अन्य कोणीही असो, लष्कराशी पंगा घेतल्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याचे जगाने पाहिले आहे.

पाकिस्तानात लवकरच सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. परंतु, पाकिस्तानचे राजकारण आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे, ज्यामध्ये निवडणूक लढविणार्‍या दोन्ही प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा लष्कराशी संघर्ष आहे. इम्रान खान गेल्या काही काळापासून लष्कराच्या राजकीय वर्चस्वाला उघडपणे आव्हान देत आहेत. दुसरीकडे 'पीएमएल'चे नेते नवाझ शरीफ यांनाही लष्करासोबतच्या त्यांच्या जुन्या संबंधातील कटुता विसरता येत नाही, ही बाब त्यांची अलीकडील विधाने पाहता लक्षात येते. अशा स्थितीत हाफिज सईदचा नव्याने स्थापन झालेला पक्ष बहुतांश जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. साहजिकच, हा पक्ष दोन्ही माजी पंतप्रधानांना वैयक्तिक आव्हानही देणारा ठरणार आहे.

पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग या हाफिजच्या नव्या पक्षाचे अध्यक्ष खालिद मसूद सिंधू हे स्वतः नवाझ शरीफ यांच्या विरोधात उभे राहणार आहेत. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने इम्रान खानच्या विरोधात उभे करण्याची तयारी सुरू आहे. याचा सरळसरळ फटका इम्रान खान आणि नवाझ शरीफांना बसणार आहे. सत्तेच्या दोन प्रमुख दावेदारांवर दबाव वाढवण्याचा हा प्रकार म्हणजे लष्कराने रचलेली रणनीती आहे, असे जाणकार अभ्यासकांचे म्हणणे आहे. हाफिज सईद आणि इतर दहशतवादी घटकांनी यापूर्वीही पाकिस्तानमध्ये निवडणुकांद्वारे सत्तेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत हाफिज सईदने अल्लाह-हू-अकबर तेहरिक पार्टीच्या बॅनरखाली देशभरात उमेदवार उभे केले होते, परंतु त्याला एकही जागा मिळाली नाही. आणखी एक दहशतवादी संघटना अहल-ए-सुन्नत बाल जमात. या संघटनेने 150 जागांवर उमेदवार उभे केले होते; पण त्यांचीही अवस्था तशीच झाली.

यावरून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी अद्याप जनतेचा विश्वास संपादन केलेला नाही, असे म्हणता येते आणि ही बाब लोकशाहीच्या, शांततेच्या पुरस्कर्त्यांना आश्वासक वाटते आहे. परंतु लोकाधार लाभलेला नसतानाही या दहशतवादी संघटनांचा राजकीय वापर पाकिस्तानी लष्कराकडून केला जाणे हे आगीशी खेळण्यासारखे आहे. कारण निवडणुकांचे राजकारण आणि समीकरण हे पूर्णतः भिन्न असते. तशातच पाकिस्तानातील जनता आज प्रचंड मेटाकुटीला आली आहे. तेथील महागाईचा दर गगनला भिडला आहे.

भिकेकंगाल झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानातील नागरिक अन्नासाठी वणवण भटकत आहेत. अशा स्थितीचा फायदा राजकीय मंडळी कसा घेतात, हे सर्वांनाच माहीत आहे. हाफिज सईदने हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून रणनीती आखली आणि आमिषे दाखवून त्याचे काही प्रतिनिधी पाकिस्तानातील कायदेमंडळात दाखल झाले, तर ती भारतासाठीच नव्हे तर जगासाठी धोक्याची घंटा असेल. कदाचित म्हणूनच भारताने त्याच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पण पाकिस्तान भारताची ही मागणी मान्य करण्याची शक्यता धूसर आहे. याचे कारण पाकिस्तानात हाफिज सईदच्या समर्थकांची मोठी ताकद आहे. सईदचे प्रत्यार्पण केल्यास पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news