ST Strike : गुणरत्न सदावर्तेच्या एसटी काम बंदचा फज्जा

ST Strike : गुणरत्न सदावर्तेच्या एसटी काम बंदचा फज्जा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासह सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांच्या एस.टी. कष्टकरी जनसंघ या संघटनेने सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. परंतु, सदावर्ते यांच्या या आवाहनाकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविली. यामुळे राज्यातील एस.टी.ची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती.

विलीनीकरण, सातवा वेतन आदी विविध मागण्यांसाठी एस.टी. कष्टकरी जनसंघाने सोमवारपासून राज्यात काम बंद आंदोलनाची नोटीस महामंडळाला दिली होती. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एस.टी.ची राज्यातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, प्रत्यक्षात एस. टी. वाहतूक सुरळीत होती.

राज्यातील एस.टी.च्या २५० आगारांतील बसेस रविवारी रात्री वस्तीच्या मुक्कामी आपल्या नियोजित थांब्यावरून गेल्या होत्या. त्यामुळे सोमवारच्या सकाळच्या सत्रात या बसेस नियमितपणे धावत होत्या. दरम्यान, सदावर्ते यांनी घेतलेल्या बैठकीत बंद आंदोलन तूर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एस.टी. कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

कर्मचाऱ्यांनी सदावर्तेना झिडकारले : संदीप शिंदे

सदावर्ते यांच्या बंदच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी अक्षरशः झिडकारले. सोमवारी १०० टक्के वाहतूक सुरू होती. आपली अव- हेलना झाकण्यासाठी सदावर्तेनी उद्योगमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन फक्त आश्वासनावर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा त्यांना करावी लागली. खरे तर सदावर्ते हे केवळ स्वतःच्या सवंग प्रसिद्धीसाठी कर्मचाऱ्यांचा वापर करीत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले आहे, अशी प्रतिक्रिया एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news