
Gujarat Election Result 2022 : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपची ऐतिहासिक विजयाकडे घोडदौड कायम आहे. मतदानाच्या पाच फेऱ्यांनंतर भाजप १५० जागांवर विजयी झाला आहे. तर काँग्रेस १९ जागांवरील आघाडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आम आदमी पक्ष ६ जागांवर आघाडीवर आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि भाजपचे उमेदवार हार्दिक पटेल ६१ हजार मतांनी आघाडीवर आहेत. गुजरातचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भुपेंद्र पटेल यांनी मोठा विजय मिळवला आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा हा मोठा विजय आहे.
निवडणूक आयोगाच्या १२ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपला आतापर्यंत ५३ टक्के मते मिळाली आहेत, तर काँग्रेसला २७ टक्के आणि आपला १३ टक्के मते मिळाली आहेत. १९९५ पासून गुजरातमध्ये भाजपला कोणी हरवू शकलेला नाही. २०१७ मध्ये भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी काँग्रेसला मोठा धक्का देत भाजपने विक्रमी बहुमताकडे वाटचाल केली आहे.
आनंद जिल्ह्यातील पेटलाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कमलेश पटेल (मास्टर) विजयी झाले आहेत. पेटलाड ही काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जात होती, पण काँग्रेसने सहावेळा जिंकून आलेले विद्यमान आमदार निरंजन पटेल यांना डावलून डॉ. प्रकाश परमार यांना उमेदवारी दिली होती. हा निर्णय काँग्रेससाठी धोक्याचा ठरला आहे.
(Gujarat Election Result 2022)
गुजरातमध्ये भाजप विक्रम मोडणार आहे. पक्षाला जास्तीत जास्त जागा आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मिळेल. आमचे सर्व उमेदवार त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा मोठ्या फरकाने विजयी होतील. भाजपचा मोठा विजय होईल- सुरत पश्चिम येथील भाजपचे उमेदवार पूर्णेश मोदी
– विरमगाममधून भाजपचे हार्दिक पटेल पिछाडीवर….
– मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आघाडीवर आहेत
– स्ट्राँग रूम उघडल्या. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
विकासाच्या जोरावर गुजरातमध्ये सरकार स्थापन होत आहे. गेल्या २० वर्षांत येथे एकही दंगल आणि दहशतवादी हल्ला झालेला नाही. लोकांना माहित आहे की भाजपने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. ते 'कमळ' चिन्हावर बटण दाबतात. कारण भाजपमध्ये त्यांचे भविष्य सुरक्षित आहे असा त्यांचा विश्वास आहे. भाजपने प्रशासन दिले आहे आणि हाच विश्वास मजबूत केला, अशी प्रतिक्रिया भाजप उमेदवार हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली आहे. १३५-१४५ जागा मिळवून आम्ही निश्चितपणे सरकार स्थापन करणार आहोत. तुम्हाला काही शंका आहे का?, असेही त्यांनी म्हटले आहे. हार्दिक पटेल हे विरमगाममधील भाजपचे उमेदवार आहेत.