Hardik Joins BJP : हार्दिक पटेल भाजपचा ‘हात’ आणखी बळकट करणार ? जाणून घ्‍या, गुजरातमधील ‘पाटीदार’ राजकारण

Hardik Joins BJP : हार्दिक पटेल भाजपचा ‘हात’ आणखी बळकट करणार ? जाणून घ्‍या, गुजरातमधील ‘पाटीदार’ राजकारण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजकारणात मागील काही वर्ष जातनिहाय मतदानावर विजयाचे 'गणित' सोडवले जाते. आज ( दि. २) गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपमध्‍ये अधिकृत प्रवेश केला. ( Hardik Joins BJP ) हा गुजरात काँग्रेससाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील पाटीदार मतांची बेरीज पुन्‍हा एकदा भाजपला सत्ता स्‍थापन करण्‍यास मदत करेल, असे अंदाजही आतापासूनच बांधले जात आहेत. जाणून घेवूया, गुजरातच्‍या राजकारणातील पटेल-पाटीदार मतांचे महत्त्‍व.

२०१७ मध्‍ये झालेल्‍या गुजरात विधानसभा निवडणुकीत अल्‍पेश ठाकोर, जिग्‍नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल हे काँग्रेसमध्‍ये होते. या तिघांपैकी हार्दिक पटेल यांचे 'अमानत' आंदोलनाचा काँग्रेसला मोठा फायदा झाला होता. मात्र पाच वर्षांमध्‍ये राज्‍यातील राजकारणात बरेच बदल झाले आहेत. आता अल्‍पेश ठाकोर यांच्‍या पाठोपाठ हार्दिक पटेल ही भाजपवासी झाले आहेत. याचा फटका काँग्रेस बसेल, असे मानले जात आहेत.

Hardik Joins BJP : २०१७ मध्‍ये काँग्रेसने भाजपला दिली होती जोरदार टक्‍कर

गुजरात विधानसभेत एकुण १८२ जागा आहेत. यातील तब्‍बल ७० मतदारसंघांमध्‍ये पटेल-पाटीदार यांचे मतदान निर्णायक ठरते. २०१७ विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदारांचे आरक्षणासाठी झालेल्‍या आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसला होता. कारण या निवडणुकीत भाजप १००चा आकडाही पार करु शकले नाही. भाजपला ९९ तर काँग्रेसला ८२ जागा मिळाल्‍या होत्‍या. पाटीदाराचा बालेकिल्‍ला मानला जाणार्‍या सौराष्‍ट्रमध्‍ये भाजपला सर्वाधिक फटका बसला होता. येथील ५६ पैकी ३२ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. भाजपला केवळ २२ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

२०१२ विधानसभा निवडणुकीत भाजपचे तब्‍बल ३२ आमदार हे पाटीदार समाजाचे होते. २०१७ मध्‍ये ही संख्‍या २८ झाली. तर काँग्रसचे २० पाटीदार आमदार जिंकले होते. सध्‍या गुजरातमध्‍ये भाजपचे ४४ आमदार, ६ खासदार आणि ३ राज्‍यसभा खासदार हे पाटीदार समाजाचे आहेत.

हार्दिकचा भाजप प्रवेशाचा कोणाला फायदा होईल?

हार्दिक पटेल यांनी गुजरात विधानसभेच्‍या तोंडावर भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. याबाबत राज्‍यातील राजकीय विश्‍लेषक सांगतात की, हार्दिकच्‍या निर्णयाचा निश्‍चित भाजपला फायदा होईरू. कारण गुजरातमध्‍ये पाटीदार समाज हा मागील अनेक वर्ष भाजपचा कट्‍टर समर्थक राहिला आहे. मतांची टक्‍केवारी पाहिली तर पाटीदार समाजाचे ८० ते ८५ टक्‍के मतदान हे भाजपला होते. विशेष म्‍हणजे, २०१७ मध्‍ये हार्दिक पटेल यांच्‍या अमानत आंदोलनावेळी पाटीदार समाजातील तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. त्‍यामुळे भाजपविरोधात संतापाची लाट पसरली होती.तरीही या निवडणीकीत पाटीदार समाज हा पूर्णपणे भाजपच्‍या विरोधात गेला नाही. आता हार्दिक पटेल भाजपवासी झाल्‍याने पाटीदार समाजाचे बहुमत भाजपला मिळेल, असे मानले जात आहे.

हार्दिक यांना भाजपमध्‍ये मोठे पद मिळण्‍याची आशा धूसर

हार्दिक पटेल हे पाटीदार आरक्षण आंदोलनातून समोर आले. मागील विधानसभा निवडणुकीत त्‍यांनी भाजपविरोधात प्रचाराचे रान उठवले. काँग्रेसने भाजपला जोरदार टक्‍कर देत ८२ मतदारसंघात आपला झेंडा फडकवला. यामागे हार्दिक पटेल यांचे योगदान मोठे होते. निवडणुकीनंतर त्‍यांच्‍यावर काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदाची धुरा सोपविण्‍यात आली. आता काँग्रेसमधील अंतर्गत वादाला कंटाळून त्‍याने भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. त्‍यांना मोठे पद मिळण्‍याची शक्‍यता कमी आहे. कारण भाजपमधील पाटीदार नेत्‍यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. त्‍यामुळे भाजपमध्‍ये हार्दिक यांना मोठे पद मिळणार नाही, मात्र त्‍यांच्‍याविरोधात सुरु असलेल्‍या कायदेशीर कारवाई थोडी थंड होईल, असे मानले जात आहे.

Hardik Joins BJP : भाजप खेळणार पाटीदार कार्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच गुजरात दौरा केला. यावेळी त्‍यांनी राजकोट जिल्‍ह्यातील अतकोट येथील पाटीदार समाजचे हॉस्‍पिटलचे उद्‍घाटन केले होते. याच दौर्‍यात खोडलधाम संस्‍थाचे प्रमुख परेश गजेरा यांना भाजपने मोठे स्‍थान दिले. कारण भविष्‍यात पाटीदार नेता नरेश पटील हे काँग्रेसमध्‍ये गेले तर परेश गजेरा यांच्‍या मदतीने पाटीदार मतांची बेरीज कायम ठेवण्‍याची भाजपची खेळी आहे. तसेच विधानसभा निवडणुकीला १५ महिन्‍यांचा कालावधी असताना मुख्‍यमंत्रीपदावरुन विजय रुपाणी यांना हटवून पाीदार नेता भूपेंद्र पटेल यांना भाजपने मुख्‍यमंत्री केले आहे. याचाही भाजपला फायदा होणार आहे.

कोणत्‍या मतदारसंघांमध्‍ये पाटीदार मतांचा प्रभाव ?

गुजरातमधील एकूण १२ टक्‍के मतदान हे पाटीदार समाजाचे आहे. हा समाज दोन गटात विभागला गेला आहे. कडवा पटेल आणि लेउवा पटेल असे त्‍यांना ओळखले जाते. हार्दिक पटेल हे कडवा पटेल समाजातील आहेत. नरेश पटेल आणि परेश गजेरा हा लेउवा पटेल आहेत. पाटीदार मतदानात कडवा पटेल ६० टक्‍के, लेउवा पटेल ४० टक्‍के आहेत. लेउवा पटेल यांचा सौराष्‍ट्र-कच्‍छ परिसरातील राजकोट, जामनगर, भावनगर, अमरेली, जूनागड, पोरबंदर, सुरेंद्रनगर, कच्‍छ या जिल्‍ह्यात लेउवा पटेलांचे दबदबा आहे. तर मेहसाणा, अहमदाबाद, कडी-कलोल, विसनगर परिसरात कडवा पटेल समाजाचे वर्चस्‍व आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news