Nagar : ग्रामपंचायतींचा आरक्षण कार्यक्रम जाहीर

Nagar : ग्रामपंचायतींचा आरक्षण कार्यक्रम जाहीर

नगर : पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षांत राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या राशीन, घोडेगाव, नेवासा बु., हरेगाव, बुरुडगाव, हळगाव यासह जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतींची 9 फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. तसेच जूनपर्यंत मुदत संपणार्‍या 67 ग्रामपंचायतींची प्रारूप मतदारयादी 14 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आरक्षण आणि मतदारयादी अंतिम झाल्यानंतर 67 ग्रामपंचायतींच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. या 84 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रभागरचना पूर्ण करून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची 9 जानेवारी रोजी मान्यता देखील घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 5 जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीचा आणि अंतिम मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 9 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतनिहाय ग्रामसभा होणार आहेत. आरक्षण आणि मतदारयादीचा अंतिम कार्यक्रम एकाच दिवशी जाहीर होणार आहे.

23 जानेवारीची यादी ग्राह्य धरणार
84 ग्रामपंचायतींपैकी जून महिन्यापर्यंत 67 ग्रामपंचायतींचा कालावधी संपत आहे. त्यामुळे या 67 ग्रामपंचायतींच्या मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी विधानसभेची 23 जानेवारी 2024 ची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारीला प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी प्रसिध्द होणार आहे. यावर 20 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या जाणार आहेत.
23 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.

23 फेब्रुवारीला अंतिम आरक्षण सोडत
प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी 9 फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या आरक्षण प्रारूप अधिसूचनेला 12 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी मान्यता देणार असून, 13 फेब्रुवारीला आरक्षण प्रारूप प्रसिद्ध होणार आहे. यावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत. उपलब्ध हरकती आणि सूचना प्रांताधिकारी 21 फेब्रुवारीपर्यंत निकाली काढणार. त्यानंतर प्रांताधिकारी यांच्या अभिप्रायावर जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) मान्यता देणार आहेत. त्यानंतर अंतिम प्रभागनिहाय आरक्षण यादी 23 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news