करंजी : सरकारकडून सामान्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक : विरोधी पक्ष नेते अजित पवार

करंजी : सरकारकडून सामान्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक : विरोधी पक्ष नेते अजित पवार

करंजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य असून, या सरकारकडून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीतून सुशिक्षित मतदारांनी या सरकारला सूचक इशारा दिला आहे, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या कामासाठी 155 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी तिसगाव येथे पार पडले. यावेळी जाहीर सभेत बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले.

महिलांना 50 टक्के आरक्षण आहे, परंतु या सरकारला एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान देता आलेले नाही. प्रत्येक आमदार मंत्री होण्यासाठी देवांना नवस बोलत आहे. अनेकांनी नवनवीन कोट शिवून ठेवलेत. परंतु, मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रण येत नसल्याने बिचारे हातबल झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

मिरी-तिसगाव योजनेच्या कामाला महाविकास आघाडीच्या सरकारनेच प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा उल्लेख पवार यांनी यावेळी केला. प्राजक्त तनपुरे पहिल्यांदाच आमदार झाले आणि शरद पवार यांच्यामुळे त्यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्याचं काम त्यांनी केले. मतदारसंघात अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याचे पवार म्हणाले.

आमदार तनपुरे म्हणाले, विरोधक मला अडीच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब मागत आहेत. मागील दहा वर्षांत त्यांना जमलं नाही ते मी अडीच वर्षांत करून दाखवलं आहे. ते दहा वर्षांत देऊ शकले नाही तेवढे पिण्याचे पाणी, वांबोरी चारीचे पाणी मागील अडीच वर्षांत लाभधारकांना दिले आहे. कोट्यवधीच्या विविध योजना मतदारसंघात आणल्या.

आमचा हिशेब तुम्हाला लिहिता पण येणार नाही, अशा शब्दात आमदार तनपुरे यांनी हिशेब मागणार्‍यांना सुनावले. तिसगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा शब्द आमदार तनपुरे यांनी खरा करून दाखविल्याचे माजी सरपंच काशिनाथ पाटील लवांडे म्हणाले. याप्रसंगी आमदार नीलेश लंके, चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके, उषाताई तनपुरे, शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी, काशिनाथ लवांडे, रफीक शेख, संपतराव म्हस्के, भगवान दराडे, क्षितिज घुले, योगिता राजळे, राहुल गवळी, सरपंच मुनिफा शेख, इलियास शेख, अनिल रांधवणे, मंगल म्हस्के, नासीर शेख, संजय कोळगे, अभिजीत ससाणे उपस्थित होते. प्रास्ताविक शिवशंकर राजळे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. आभार अमोल वाघ यांनी मानले.

हिंमत असेल तर निवडणुका घ्या
नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. यावरून सुशिक्षित मतदारांनी या सरकारला सूचक इशारा दिला आहे. हिंमत असेल तर राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हानही अजित पवार यांनी सरकारला दिले.

logo
Pudhari News
pudhari.news