खासदार राऊत धमकी प्रकरणी सरकारने योग्य पावले उचलावीत : विरोधी पक्षनेते अजित पवार

खासदार राऊत धमकी प्रकरणी सरकारने योग्य पावले उचलावीत : विरोधी पक्षनेते अजित पवार
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणी पोलिस विभाग, सरकारने योग्य ती नोंद घेत पुढील कार्य़वाही करावी, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. सरकारला जनतेची पण काळजी घ्यावी लागते, पण जनतेचे प्रतिनिधी असलेल्या खासदाराबाबत अशा घटना घडत असतील तर लोकसभा, राज्यसभा त्याची दखल घेते. मी यासंबंधी माहिती घेत आवश्यक ते सहकार्य करेन, असेही ते म्हणाले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींना धमक्या आल्या आहेत. कधी त्यात तथ्य असते, कधी माथेफिरु लोकं अशा पद्धतीचे फोन करतात. तपास यंत्रणांनी त्याचा तपास करावा, त्यामध्ये कोणी जाणिवपूर्वक काही करत असेल तर ते चुकीचे आहे. राज्यात वारंवार घडणाऱया या घटना गृहखात्याचे अपयश आहे का, या प्रश्नावर ते शोधण्याचे काम मिडियाने करावे, असेही पवार म्हणाले.

संभाजीनगरचा प्रकार समाजातील अंतर्गत प्रकार
संभाजीनगरला झालेला प्रकार हा एका समाजातील अंतर्गत प्रश्न आहे. दोन वेगवेगळ्या समाजात तेथे दंगल झालेली नाही. परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम पोलिस यंत्रणेने केले आहे. आम्ही पण ते करत आहोत. या विषयाला कारण नसताना मिडियाने वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये. ते आपापसातले भांडण होते. परंतु छत्रपती संभाजीनगर मुळे त्याला वेगळी प्रसिद्धी मिळाली. तेथे रविवारी आयोजित महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली असून सभा व्यवस्थित पार पडेल, असे अजित पवार म्हणाले.

तारतम्य ठेवले पाहिजे
दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या निधनानंतर पुण्यात लागलीच काहींनी भावी खासदाराचे फलक झळकवल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, मी काल बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आपल्यात १३-१४ दिवस दुखवटा पाळला जातो. अजून त्यांच्या अस्थीचे विसर्जन झाले नाही. आपल्यामध्ये जरा माणूसकी राहू द्या, एवढे गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. सत्ताधारी व विरोधकांनीही यात तारतम्य बाळगले पाहिजे.

माहिती घेवूनच बोलेन
जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड झालेले जैतापूर गाव मध्यप्रदेशाच्या हद्दीतील असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, एवढ्या मोठ्या राज्यात एखाद-दुसरी घटना घडते. पण मी विरोधी पक्षनेता असल्याने उत्तर देत असताना हातात कागद पाहिजे. तुमच्या प्रश्नावर सांगीवांगी उत्तर देवू शकत नाही. मी माहिती घेवून उत्तर देईन. पण खरेच असे घडले असेल तर संबंधितावर कारवाई व्हायला हवी. परंतु तत्पूर्वी हे खरेच घडलेय का हे पाहू द्या.

त्यांना विचारून उत्तर देतो
शनिवारी बारामतीत बोलताना पवार यांनी माध्यम प्रतिनिधींना बोल सुनावले. संभाजीनगरमधील प्रकाराला वेगळे वळण देवू नका, असे पवार म्हणाले. रामनवमीला देशाच्या काही भागात झालेल्या दंगलीसंबंधी, आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे, तेथील राज्याबद्दल तेथील लोक बोलतील. असेही पवार म्हणाले. राज्यात वारंवार गंभीर प्रकार घडत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासंबंधी मी गृहमंत्री झाल्याने काहींना हे सहन होत नसल्याने असे प्रकार होत असल्याचे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, माझी व त्यांची भेट होईल. त्यावेळी मी त्यांना यासंबंधी विचारणा करेन. बारामतीत एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला होता, पण मी उत्तर देवू शकलो नाही, असे सांगत माहिती घेईन अन मग तुम्हाला नंतर उत्तर देईल, या शब्दात पवार यांनी फटकारले. मला अशा गोष्टींना राजकीय रंग दिल्याचे अजिबात आवडत नाही, असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news