पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगल इंडियाने (Google India) विविध विभागांतील ४५३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकल्याचे मेलद्वारे कळवण्यात आले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. बिझनेसलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, ४५३ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचे मेल गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी पाठवला आहे.
गेल्या महिन्यात Google ची मूळ कंपनी Alphabet Inc ने घोषणा होती केली की, ते १२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार आहे. ही नोकरकपात जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६ टक्के एवढी आहे. ४५३ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय हा १२ हजार जणांच्या नोकरकपातीचा भाग आहे की आणखी नवीन नोकरकपात आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
या वृत्तात असेही म्हटले आहे की मेलमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या काही इनपुटचादेखील समावेश आहे. त्यांनी कंपनीच्या नोकरकपातीच्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी जानेवारीमध्ये पाठवलेल्या नोटमध्ये, असा दावा केला होता की अमेरिकेच्या बाहेरील कामावरून काढलेल्या Google कर्मचार्यांना लोकल प्रॅक्टिसेसनुसार मोबदला मिळेल. जागतिक स्तरावर किती कर्मचार्यांवर या नोकरकपातीचा परिणाम झाला आहे किंवा कंपनीमधून आणखी किती जणांना काढून टाकले जाईल हे स्पष्ट झालेले नाही. (Google India)
नोकरकपातीचा निर्णय घेणारी Google ही एकमेव टेक कंपनी नसून Amazon ने १८ हजार कर्मचार्यांमधून काढून टाकण्याची योजना जाहीर केली होती. याआधी Amazon ने १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याचे म्हटले होते. पण त्यानंतर नोकरकपातीचा आकडा वाढवण्यात आला. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने (Meta) १३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नोकरकपातची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
हे ही वाचा :