नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चिंतामणवाडी (ता. इगतपुरी) या कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेली गावातील महिलांना दररोज दोन किलोमीटर पायी चालत दऱ्या-खोऱ्यातून हंड्यांनी पाणी आणावे लागत होते. मात्र, महिलांची ही होणारी फरफट पाहून ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत गावातच सोलर सिस्टीम बसविण्यात आल्याने येथील महिलांच्या डोक्यावरील हंड्यांचा भार हलका झाला आहे.
सुमारे पाचशे लोकसंख्या असलेल्या चिंतामणवाडी येथील पाण्याची समस्या लक्षात घेत यश फाउंडेशन व महिंद्रा आणि महिंद्रा (इगतपुरी) यांच्या माध्यमातून गावात हा सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध झाली आहे. या सौर प्रकल्पामुळे ऊर्जेचे संरक्षण होण्यास मदत होण्याबरोबरच पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे. या सोलर प्लांटचा फायदा चिंतामणवाडी गावातील सुमारे 600 ग्रामस्थांना होणार आहे. या प्रकल्पाच्या लाेकार्पणप्रसंगी राजेश खानोलकर यांनी महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला असून, यामुळे ग्रामस्थांची पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे म्हटले. तर या प्रकल्पामुळे महिलांचे कष्ट कमी झाले तर समाधान लाभेल, अशी भावना यावेळी यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी जयंत इंगळे महिंद्रा आणि महिंद्राचे (इगतपुरी) अधिकारी, महिंद्राचे अधिकारी जयंत इंगळे, सरपंच, महिंद्रा, यश फाउंडेशनचे स्वयंसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
दररोज होणार पायपीट थांबली
गावातील पाण्याची समस्या सोलरच्या माध्यमातून सुटणार आहे. त्यासाठी महिंद्रा आणि यश फाउंडेशन यांचे आभारी आहे. या प्रकल्पामुळे दारातील नळाला पाणी येऊन आमची पाण्यासाठीची पायपीट थांबल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.