गोंदिया : सडक अर्जुनीत सहा लाचखोरांना एसीबीचा दणका

Gondia News
Gondia News
Published on
Updated on
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau) गोंदियाच्या पथकाने आठवडाभरात जिल्ह्यात दुसरी मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील (जि. गोंदिया) नगर पंचायत कार्यालयात मंगळवार (दि.१४) केलेल्या सापळा कारवाईत नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरसेवक व नायब तहसीलदारासह इतर दोन लाचखोर जाळ्यात अडकले असून एका कंत्राटदारांकडून १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेताना पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

एसीबीची कारवाई

  • गोंदियाच्या एसीबी पथकाने आठवडाभरात जिल्ह्यात दुसरी मोठी कारवाई.
  • नगराध्यक्ष, दोन नगरसेवकांसह नायब तहसीलदार व इतर दोघे जाळ्यात.
  • १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात
तेजराम किसन मडावी (वय ६६, नगराध्यक्ष, सडक अर्जुनी), शरद विठ्ठल हलमारे (वय ५६ , नायब तहसीलदार,अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी, नगर पंचायत,सडक अर्जुनी ( वर्ग२), अश्लेश मनोहर अंबादे (वय ३५ , बांधकाम सभापती, न. प. सडक अर्जुनी), महेंद्र जयपाल वंजारी (वय ३४, नगरसेवक सडक अर्जुनी)  जुबेर अलीम शेख,  राजू शेख ( रा. प्रभाग क्रं ४, सडक अर्जुनी), शुभम रामकृष्ण येरणे (वय २७ रा. सडक अर्जुनी) अशी आरोपींची नावे असून तक्रारदार हे भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रहवासी आहेत. तर तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार आहे.  त्यास नगर पंचायत सडक अर्जुनी अंतर्गत वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदान सन २०२३-२४ लेखाशिर्ष (२२१७ १३०१) या योजने अंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई निविदा मंजूर झाल्याने त्यांनी सुरक्षा रक्कम भरली आहे.
दरम्यान, कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदार यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्ष यांनी निविदा रकमेच्या १५% रक्कम लाचेची मागणी केली. मात्र, त्यांना लाच द्यायची ईच्छा नसल्याने त्यांनी १३ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यावर पथकामार्फत मंगळवारी सायंकाळपर्यंत सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मडावी यांनी निविदा रक्कम १२ लाख १५ हजार ६३४ रुपये रकमेच्या १५% टक्के प्रमाणे १ लाख ८२ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. तर इतर आरोपींनी या मागणीला प्रोत्साहन दिले. दरम्यान, नगराध्यक्ष यांनी लाच रक्कम खासगी आरोपी शुभम येरणे याच्या दुकानात देण्यास सांगितल्याने आरोपी शुभम याने लाच रक्कम स्विकारली. दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच रकमेसह रंगेहाथ पकडून सहापैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर सर्व आरोपींच्या विरोधात डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवडाभरात दुसरी मोठी कारवाई….

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यात आठवडाभरात ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली असून यापूर्वी गोरेगाव येथील तहसीलदारसह तिघांना लाच प्रकरणात ताब्यात घेतले होते. त्यात आता एसीबीकडून सहा लाचखोरांवर कारवाई करण्यात आली असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोणी केली कारवाई?

सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उप अधीक्षक विलास काळे, यांच्या मार्गदर्शनात अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलिस निरीक्षक उमाकांत उगले, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले, चालक नायक पोलीस शिपाई दिपक बाटबर्वे यांनी केली.
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news