सोन्याला झळाळी, मात्र उद्योग काळवंडला

सोन्याला झळाळी, मात्र उद्योग काळवंडला

हुपरी : लग्नसराईच्या तोंडावर सोने दरात विक्रमी वाढ झाल्याने कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे, तर कमाईच्या काळातच काम नसल्यामुळे लाखो कारागीर व त्यांची कुटुंबे चिंतेत आहेत. लग्नाच्या हंगामापूर्वी येणार्‍या ऑर्डरच नसल्याचे चित्र आहे.

देशात सराफ उद्योगात लाखो लोक गुंतले आहेत. उद्योगाशी निगडित अनेक पूरक व्यवसाय आहेत. हजारो तरुण कर्जे काढून हा व्यवसाय करत आहेत. ज्वेलरी उद्योगातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. सध्या विक्रमी दरवाढ होत आहे, तर जीएसटीचाही ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.

आंतरराष्ट्रीय जगतातील अस्थिरतेमुळे सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने विक्रमी उडी घेतली आहे. सध्याचा सोन्याचा दर, त्यावरील आयात शुल्क व जीएसटी यामुळे सोने खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. लग्नसराईत सोने खरेदी होते. सराफांकडे मोठ्या प्रमाणावर ऑर्डर असतात; मात्र दरवाढीमुळे ग्राहकांनी सोने खरेदीचा बेत रद्द केला आहे. त्याचा परिणाम सराफ उद्योगावर झाला आहे.

कर्ज काढून या उद्योगात अनेक तरुण उतरले आहेत; पण ग्राहकच नसल्यामुळे त्यांच्यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. सराफ उद्योगातून देशाला मोठ्या प्रमाणावर कर मिळतो. तरीही सरकार या व्यवसायाला विविध नियम लावून गळचेपी करीत आहे. दरवाढ आणि जीएसटी यामुळे सोन्याची मूळ किंमत आणि कराची रक्कम यामुळे या व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे.

सराफ उद्योग शांतच

गेले काही दिवस दराचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे सराफ उद्योग शांत आहे. अनेक सराफ, त्यातील कारागीर आणि पूरक व्यावसायिक, तसेच या उद्योगांवर अवलंबून असणारी लाखो कुटुंबे सध्या काळजीत आहेत. अनेक कारागिरांना काम नसल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news