गोकुळ, जिल्हा बँकेच्या संचालकांची भूमिका काय?

गोकुळ, जिल्हा बँकेच्या संचालकांची भूमिका काय?
Published on
Updated on

गुडाळ : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख लढती स्पष्ट झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीवर नेहमीच प्रभाव राहणार्‍या गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या दोन प्रमुख शिखर संस्थांमधील संचालकांची ताकद निवडणुकीत कोणामागे राहणार, ही नेहमीच औत्सुक्याची बाब असते. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रथमच जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनेक नगरपालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने या संस्थांतील पदाधिकारी, नगरसेवक, सदस्य अशी पदे मात्र रिक्त आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत 21 संचालक असून, चेअरमन ना. हसन मुश्रीफ यांच्यासह बँकेतील तब्बल 15 संचालक महायुतीबरोबर, तर सहा संचालक महाविकास आघाडीसोबत राहतील, असे चित्र आहे. गोकुळमध्ये 21 निर्वाचित आणि दोन स्वीकृत, एक शासननियुक्त असे 24 संचालक आहेत. चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्यासह आठ निर्वाचित, एक शासननियुक्त आणि एक स्वीकृत असे दहा संचालक महायुतीसोबत राहतील, तर गोकुळचे नवनिर्वाचित 12 आणि एक स्वीकृत असे 13 संचालक आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसोबत राहतील, असे चित्र आहे. संचालक चेतन नरके हे स्वतःच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार असण्याची शक्यता आहे.

देशात आणि राज्यातील राजकारणात कशाही आघाड्या असल्या, तरी कोल्हापुरातील आघाडीचा पॅटर्न मात्र वेगळाच आहे. देश आणि राज्य पातळीवर एकमेकांच्या विरोधात असलेल्या पक्षांचे कार्यकर्ते सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येऊन आघाडी करत असल्याचे चित्र येथे आहे.

जिल्ह्यातील अर्थकारणाचा प्रमुख कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशाच प्रकारच्या आघाड्या कार्यरत आहेत. लोकसभेच्या पक्षीय राजकारणात मात्र या आघाडीतील कारभार्‍यांच्या वाटा वेगळ्या असणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालकांपैकी राष्ट्रवादीचे आठ, शिवसेना शिंदे गटाचे चार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आणि भाजपाचा एक असे 15 संचालक महायुतीकडे राहतील, तर राष्ट्रीय काँग्रेसचे पाच आणि राष्ट्रवादीचे एक नाराज संचालक महाविकास आघाडीसोबत राहतील, असे संकेत आहेत.

महायुतीच्या 15 संचालकांपैकी नऊ संचालक कोल्हापूर मतदारसंघात, तर सहा संचालक हातकणंगले मतदारसंघात आहेत. महाविकास आघाडीच्या सहा संचालकांपैकी पाच संचालक कोल्हापूर मतदारसंघात, तर एक संचालक हातकणंगले मतदारसंघात आहे.

संचालकांचे तालुक्यांत नेटवर्क

गोकुळच्या महायुतीकडे असलेल्या 10 संचालकांपैकी आठ संचालक कोल्हापूर मतदारसंघात, तर दोन संचालक इचलकरंजी मतदारसंघात आहेत. महाविकास आघाडीकडील 13 संचालकांपैकी 10 संचालक कोल्हापूर मतदारसंघात, तर तीन संचालक हातकणंगले मतदारसंघात आहेत. जिल्हा बँक आणि गोकुळमधील संचालकांचे संबंधित तालुक्यांत स्वतःचे एक वेगळे नेटवर्क असल्याने सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. साहजिकच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या रस्सीखेचीत लोकसभा निवडणुकीत या संचालकांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news