गुन्हे तपासात गोवा ठरले देशात अव्वल; यशस्वी तपासाची टक्केवारी 96.12

गुन्हे तपासात गोवा ठरले देशात अव्वल; यशस्वी तपासाची टक्केवारी 96.12

गोवा; विठ्ठल गावडे पारवाडकर : 2022 वर्षे गाजले ते हरियाणा येथील भाजपच्या नेत्या व प्रसिद्ध टीक टॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या गोव्यात झालेल्या खुनाने. एका बाजूला 2022 या वर्षात गुन्हगारीची अनेक प्रकरणे घडली असली तरी गोवा पोलिसांची गुन्हे तपासाची टक्केवारी मात्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिली. गोवा पोलिसांनी वर्षभरात सरासरी 87 टक्के गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले. गोवा पोलिसांची 11 महिन्यांतील कामगिरी पाहता 2,380 गुन्ह्यापैकी 2,069 प्रकरणांचा तपास करण्यात गोवा पोलिसांना यश आले. यशस्वी तपासाची टक्केवारी 96.12 इतकी राहिली.

गोवा हे जागतिक पर्यटनाचे केंद्र आहे. त्यामुळे गोव्यात देशी परदेशी लाखो पर्यटक दरवर्षी गोव्याला भेट देतात. त्यातील बहुतांश हे जिवाचा गोवा करण्यासाठी येत असतात, तर काहीजण मौजमजा करतानाच भान हरपून बसतात आणि मग त्यांच्यातील सैतान जागा होतो व कुणाचा पूर्वीच्या वैमनस्यातून काटा काढला जातो, तर कुणाचा संपत्तीच्या हव्यासा पोटी काटा काढला जातो. सोनाली फोगाट यांचा खूनही संपत्तीच्या लालसेने केल्याचे प्रथमदर्शनी तपासात सिद्ध झाले असून या खुनाच्या आरोपाखाली फोगाट यांचे स्वीय सचिव सुधीर सांगवान व त्यांचा मित्र सुखविंदर सिंग यांना अटक करण्यात आलेली आहे. गोवा पोलिसाकडून हे प्रकरण सध्या सीबीआयकडे पोचले आहे. सोनाली फोगाट या राजकीय नेत्या म्हणून जास्त प्रसिद्ध नव्हत्या. मात्र नृत्यांगना म्हणून त्या विशेषत: उत्तर भारतात बर्‍याच प्रसिद्ध होत्या. त्यांच्या खुनानंतर गोव्यासह देशभरातही या खुनाचा बराच गाजावाजा झाला. वृत्तवाहिन्यावर बरीच चर्चा सुरू झाली. सांगवान व सिंग या त्यांच्यासह गोव्यात आलेल्या सहकार्‍यांनी सोनाली फोगाट यांना सिंथेटिक ड्रग्ज पाजल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

23 ऑगस्ट रोजी उत्तर गोव्यातील हणजूण येथील सेंट अँथनी रुग्णालयात सोनाली फोगाट (42) यांना मृत घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी संगवान व सिंग यांच्यासह ज्या रेस्टारंटमध्ये फोगाट यांना मद्यातून जबरदस्तीने सिंथेटिक ड्रग्ज देतानाचा व्हिडीओ पुढे आले त्या कार्लीस रेस्टोरेंटचे मालक एडविन नुनीज याच्यासह संगवान यांना अमली पदार्थ विकणारा रामा मांद्रेकर आणि तो आणून देणारा रुम बॉय दत्तप्रसाद गावकर यांना अटक केली. नुनीज हा अमली पदार्थाचा व्यवहार करत असल्याचे पुढे स्पष्ट झाले आणि हैद्राबाद पोलिसांनी त्याला दोन वेळा अटकही केली.

सोनाली फोगाट या प्रसिद्धीचे वलय असलेल्या अभिनेत्री असल्याने या खुनाचा बराच गाजावाजा झाला. मात्र गोव्यातील हळदोण्याची सिद्धी नाईक हिचा मृतदेह समुद्र किनार्‍यावर अर्धनग्न अवस्थेत मिळूनही पोलिस तिच्या मृत्यूचे नेमके कारण शोधू शकले नाहीत. सिद्धी नाईक हिच्या कुटुंबीय अद्यापही न्यायाची प्रतीक्षेत आहे.

1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2022 या 11 महिन्यांच्या काळात गोवा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. गंभीर गुन्ह्यांचा तपासाची टक्केवारी तर तब्बल 96.12 टक्के राहिली. 11 महिन्यात राज्यात गोवा पोलिसांनी 41 खून, 64 बलात्कार, 18 खून करण्याचा प्रयत्न, 3 मनुष्यवध आणि 3 दरोडे अशा एकूण 129 गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यापैकी फक्त चार खून आणि एका बलात्काराचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले इतर सर्वांचा तपास त्यांनी लावला. या व्यतिरिक्त इतर सर्व गंभीर गुन्ह्यांचा तपास 100 टक्के लावण्यात गोवा पोलिसांना यश आले. त्यामुळे यशस्वी तपासाची टक्केवारी 96.12 इतकी राहिली. आकडेवारीतून तपास लावण्यात उत्तरेचे पोलिस काहीसे सरस ठरल्याचे दिसते. वरील कालावधीत उत्तर गोवा पोलिसांनी एकूण 1,350 गुन्हे दाखल केले आहेत. त्यांतील 1,178 गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला. यशस्वी तपासाची ही टक्केवारी 87.26 टक्के एवढी होते. दक्षिण गोवा पोलिसांनी 1,030 गुन्हे दाखल केले असून त्यातील 891 गुन्ह्यांचा तपास लावला. त्यांची यशस्वी तपासाची ही टक्केवारी 86.50 टक्के एवढी आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली 2,380 गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 2,069 गुन्ह्यांचा तपास लावून संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. तपास लावण्याची ही टक्केवारी 86.93 म्हणजेच 87 टक्के इतकी आहे. या आकडेवारीत गुन्हा शाखा, कोकण रेल्वे, महिला पोलिस स्थानक, दहशतवाद विरोधी पथक, अमली पदार्थ विरोधी पथकांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा किंवा तपासाचा समावेश नाही. 68.54 टक्के चोर्‍यांचा यशस्वी तपास दोन्ही जिल्ह्यांत घरफोड्या, दरोडा, मोबाईल व वाहनांची चोरी तसेच इतर प्रकारची चोरी मिळून 550 गुन्हे दाखल झाले आहेत. यातील फक्त 377 चोर्‍यांचा यशस्वी तपास लागला. छडा लावण्याचे हे प्रमाण 68.54 टक्के इतके राहिले.

11 महिन्यात 12 मोठ्या चोर्‍या झाल्या होत्या या सर्व 12 प्रकरणांचा छडा लागला. 82 घरे फोडण्यात आली, यातील 61 प्रकरणांचा छडा लागला. दिवसाढवळ्या 23 चोर्‍या झाल्या. त्यातील 19 प्रकरणांचा छडा लागला. रात्रीच्या वेळी 73 चोर्‍या झाल्या. पैकी 42 चोर्‍यांचा छडा पोलिसांनी लावला. 23 सोनसाखळ्या चोरण्यात आल्या. त्यातील 11 प्रकरणांचा छडा लागला. शिवाय 139 वाहन चोर्‍यांपैकी 78 व इतर प्रकारच्या 198 चोर्‍यांपैकी 154 प्रकरणांचा छडा लागला. दोन्ही जिल्ह्यांमध्ये 11 महिन्यांत फसवणुकीच्या 144 गुन्ह्यांपैकी 97 गुन्ह्यांचा छटा लावण्यात आला. विश्वासघात केल्याप्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांपैकी सर्वच म्हणजे 28 प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. अपहरणाच्या 79 गुन्ह्यांपैकी 64 गुन्ह्यांचा तपास करण्यात आला. तर मारामारीच्या 234 गुन्ह्यांपैकी 226 गुन्ह्यात संशयितांना अटक करण्यात आली. अपघाती मृत्युप्रकरणी 159 गुन्ह्यांपैकी 152 गुन्ह्याचा तपास लावला गेला. इतर अपघातांच्या 268 गुन्ह्यांपैकी 260 गुन्ह्यांत संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तावडीतून किंवा कैदेतून फरार झालेल्या 3 पैकी 2 गुन्ह्यांत संशयितांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. घर, आस्थापन व इतर ठिकाणी अतिक्रमण किंवा घुसखोरी केल्याप्रकरणी दाखल झालेल्या सर्व 22 गुन्ह्यांत पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. तर भादंसंच्या इतर 1,020 गुन्ह्यांपैकी 965 गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अशा प्रकारे राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना गोवा पोलिसांनी गुन्ह्यांच्या तपासात देशात अव्वल ठरला. त्यामुळे नेहमीच टीका होणार्‍या पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप ही द्यावीच लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news