Goa Assembly Monsoon session : गोवा विधानसभेमध्ये धक्काबुक्की; विरोधी आमदार दोन दिवसांसाठी निलंबित

Goa Assembly Monsoon session : गोवा विधानसभेमध्ये धक्काबुक्की; विरोधी आमदार दोन दिवसांसाठी निलंबित

पणजी: गोवा विधानसभेत (Goa Assembly Monsoon session) आज (दि. ३१) मोठा अनुचित प्रकार घडला. मगो आमदार जीत आरोलकर यांना धक्का बुक्की करणे, त्यांचा माईक काढून टाकणे, त्यांच्या डोक्यावर सुरक्षा रक्षकांची टोपी जबरदस्तीने घालणे, असे प्रकार केल्याबद्दल काँग्रेसच्या तीन आमदारांसह विरोधी सर्व सातही आमदारांना दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

शुन्य प्रहरावेळी काळे कपडे परिधान करून आलेल्या विरोधी आमदारांनी मणिपूर प्रश्नावर चर्चेची मागणी करत सभापतींसमोर मोठा गदारोळ घातला. सभापतींनी शुक्रवारी खासगी विधेयकाचा (Goa Assembly Monsoon session) दिवस असल्यामुळे त्या दिवशी यावर चर्चा होऊ शकते असे सांगितले. मात्र, विरोधी आमदार आक्रमक होऊन हातात फलक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आसनासमोर येऊन त्यांना घेराव घातला. असा प्रकार आतापर्यंत कधीच घडला नव्हता. त्यानंतर शून्य प्रहर सभापतींनी जाहीर केल्यामुळे आमदार जित आरोलकर हे बोलण्यास उभे राहिले असता सर्व सातही विरोधी आमदार त्यांच्या जवळ गेले. व त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचा शर्ट ओढला. सुरक्षा रक्षकाची टोपी त्यांच्या डोक्यावर चढवली. त्यांच्या हातातील कागद काढून घेतला आणि माईक हिसकावला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील सर्वच सदस्य संतप्त झाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा प्रकार विधानसभेच्या कामकाजामध्ये फार धक्कादायक असल्याचे सांगून यावेळी कारवाई झाली नाही, तर त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली. तसेच विरोधी आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

ज्येष्ठ आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, असा प्रकार गेल्या साठ वर्षांमध्ये कधी गोवा विधानसभेमध्ये घडला नव्हता. सभापतींच्या समोर उभे राहणे, एक वेळ समजता येते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या समोर अशाप्रकारे निदर्शने करणे आणि आमदाराला धक्काबुक्की करणे हे चुकीचे आहे.

संसदीय कामकाज मंत्री निलेश काब्राल यांनी विरोधी आमदारांना आठ दिवस निलंबित करण्याची मागणी केली. आमदार आरोलकर यांनीही आपणाला न्याय हवा अशी मागणी केली. शेवटी सभापतींनी सभागृहात गैरवर्तन करून विधानसभा कामकाज कायदा २८९ चा भंग केल्याबद्दल गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, एल्टन डिकोस्टा, अॅड. कार्लूस फेरारा, आम आदमी पक्षाचे आमदार वेन्सी वियेगस, क्रुझ सिल्वा व आरजी पक्षाचे आमदार विरेश बोरकर या सातही विरोधी आमदारांना १ ऑगस्टपर्यंत निलंबित केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news