केंद्राने डोळे वटारताच गोवा सरकारने गुंडाळला ‘फेस्टीव्हल ऑफ आयडीयाज’

केंद्राने डोळे वटारताच गोवा सरकारने गुंडाळला ‘फेस्टीव्हल ऑफ आयडीयाज’
Published on
Updated on

पणजी; सुरेश गुदले : केंद्र सरकारने डोळे वटारताच गोवा सरकारने बहूचर्चित अशी डी. डी. कोसंबी व्याख्यानमाला रद्द केली. डाव्या विचारसरणीचे वक्ते या व्याख्यानमालेत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. तडकाफडकी घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर गोवा सरकारने मात्र ही व्याख्यानमाला लांबणीवर टाकल्याचे जाहीर करून सेफ मोडला राहणे पसंत केले. समाजमाध्यमांवर गोवा सरकारने ही व्याख्यानमाला गुंडाळली, असाच मतप्रवाह व्यक्त होत आहे. सरकारमधील सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे.

दामोदर धर्मानंद म्हणजेच डी. डी. कोसंबी या विचारवंताने भारतीय इतिहास लेखनाला दिशा दिली. त्यांना भारताच्या शास्त्रोक्त इतिहासाचे जनक म्हणून ओळखले जाते. मूळचे गोव्याचे असणारे डी. डी. कोसंबी यांची शंभरावी जयंती 2007 मध्ये गोवा सरकारने साजरी केली. त्यानंतर 2008 पासून त्यांच्या नावाने डी. डी. कोसंबी व्याख्यानमाला गोव्यात होत होती. 'फेस्टीव्हल ऑफ आयडीयाज' अशी या व्याख्यानमालेची सर्वदूर ओळख आहे. या महोत्सवाचे हे 14 वे वर्ष आहे. गोवा सरकारने ही व्याख्यानमाला रद्द केली आहे. डाव्या विचारसरणीचे वक्ते या व्याख्यानमालेत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

कला व संस्कृती खात्यातर्फे कला-अकादमीत होणार्‍या या व्याख्यानमालेस श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद असे. एक हजार आसन क्षमतेचे सभागृह पंधरा मिनिटात हाऊसफुल्ल होत असे. इतकेच नव्हे तर सभागृहाबाहेरही स्क्रीन लावाव्या लागत असत. सुमारे पाचशे श्रोते सभागृहाबाहेर थांबून विचारकण वेचायचे. सरकारच्या कला व संस्कृती खात्यातर्फे वक्त्याच्या भाषणाच्या ऑडीओ आणि व्हिडीओ यांची निर्मिती केली करून विक्री केली जात होती. विचारमंथनाची ही परंपरा आता बंद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासूंना या व्याख्यानमालेत ऐकता येत होते. व्याख्यानानंतर त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करता येत असे, ती मोठी बौद्धीक मेजवानी होती.

असे होते वक्ते

दक्षिण गोवा जिल्ह्यातील मडगाव येथे 10 ते 14 नोव्हेंबर येथे ही व्याख्यानमाला होणार होती. त्यामध्ये दामोदर मावजो, माधवी मेनन, डॉ. देवदत्त पटनायक, डॉ. सूरज येंगडे, प्रणय लाल असे वक्ते होते.

…म्हणून व्याख्यानमाला गुंडाळण्यात आली

केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणार्‍या वक्त्यांना का बोलावले, अशी विचारणा केंद्राकडून झाल्याची विश्वसनीय माहिती राज्यातील भाजप सरकारमधील सूत्रांनी दिली. डॉ. सूरज येंगडे सातत्याने मोदी सरकारवर टीका करतात. अशा काही नावांना केंद्रातून तीव्र विरोध झाल्यामुळेच व्याख्यानमालाच गुंडाळण्यात आली. वक्त्यांनाही  तातडीने कळविण्यातही आले असल्याची माहीती मिळत आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला : दामोदर मावजो

दामोदर मावजो
दामोदर मावजो

ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी या निर्णयाविषयी दैनिक पुढारीजवळ आश्चर्य व्यक्त केले. असे करायला नको होते, असे ते म्हणाले. देशभर काय चालले आहे ते आपण पाहत आहोतच. गोव्यातही ते घडले, याचे खूप वाईट वाटते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे. जनतेने हे राजकारण समजून घेतले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news