गोवा : राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून गणेश गावकर यांनी घेतली शपथ, मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स वाढला

गोवा : राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून गणेश गावकर यांनी घेतली शपथ, मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स वाढला

पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभेत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना आमदारकीची शपथ देण्यासाठी राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून सावर्डेतून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकलेले गणेश गावकर यांना राज्यपालांनी आज राजभवनात आपले प्रतिनिधी म्हणून शपथ दिली. गावकर उद्या मंगळवारी गोवा विधानसभेत साडेअकरा वाजता सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना आमदारकीची शपथ देणार आहेत.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याची विधानसभा शनिवारी विसर्जित केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा राजीनामा स्वीकारून काळजीवाहू सरकारही नियुक्त केले आहे. राज्यपालांनी मंगळवारी राज्य विधानसभेचे खास अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात केवळ शपथविधी होणार असून त्यानंतर अधिवेशन संपेल. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलवावे लागणार आहे. कारण तत्पूर्वी अर्थसंकल्प मांडून किमान लेखानुदान राज्य सरकारला मंजूर करून घ्यावे लागणार आहे. त्यापूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणे अपेक्षित आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत २० जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु, भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सस्पेन्स वाढला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्यपालांनी भाजपचे आमचे आमदार गणेश गावकर यांना शपथ दिली आहे. तर त्यांची इतर आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी त्यांची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे.

गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी गणेश गावकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दक्षिण गोव्यामधील सावर्डे मतदारसंघातून दुसऱ्यांदा गावकर आमदार म्हणून निवड आलेले आहेत. राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून ते आमदारांना शपथ देतील.
दरम्यान, भाजपला विधानसभा निवडणुकीत २० जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला बहुमतासाठी १ जागा कमी आहे. परंतु तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांनी विनाशर्त पाठिंब्याचे पत्र भाजपला दिले आहे. त्यामुळे भाजपचा बहुमताचा आकडा २५ वर गेला आहे. दरम्यान, काँग्रेसला केवळ ११ जागा मिळालेल्या आहेत. तर गोवा फॉरवर्ड पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

 हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : झुंड सिनेमा ज्यांच्यावर आधारित आहे त्या विजय बारसेंना काय वाटतं 'झुंड'विषयी ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news