मडगाव; पुढारी वृत्तसेवा : देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत चाललेली असताना, गुरुवारी वेर्णा येथील पठारावर एक परप्रांतीय युवती अर्धनग्न अवस्थेत सापडून आल्याने खळबळ उडाली. त्या युवतीला बेशुद्ध करून तिच्यावर अतिप्रसंग केला जात होता. काही युवकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेणार्या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. त्या युवतीला वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीच्या मागील बाजूला असलेल्या निर्जन स्थळी नेण्यात आले होते. या प्रकरणात आणखीही युवक गुंतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत तिला शुद्ध आली नव्हती. तिला शुद्ध आल्यानंतरच पोलिसांना सविस्तर प्रकरण कळणार आहे.
सविस्तर माहितीनुसार काही युवक गुरे चारण्यासाठी त्या पठारावर गेले होते. अचानक त्यांना झाडीत हालचाल होत असल्याचे दिसून आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एक युवती अर्धनग्न अवस्थेत झाडीत पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले; तर अन्य एक युवक तिच्यावर अतिप्रसंग करत होता. युवकांना पाहून त्याने तिला कपडे घालण्यास सुरू केले. पण, युवकांनी वेर्णा पोलिसांना त्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. तर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. स्थानिक युवकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी आणखीही काही युवक उपस्थित होते. त्या सर्वांनी तिला बेशुद्ध करून तिचा गैरफायदा घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला. प्रकरण उघडकीस येताच ते पसार झाले.
ही युवती पंजाबची रहिवासी असल्याचे कळते. पोलिस निरीक्षक डायगो ग्रेसीयस यांनी सांगितले की, ती युवती दारूच्या नशेत होती, असे आपल्याला इस्पितळातून सांगण्यात आले आहे. ती शुद्धीत येण्याची पोलिस वाट पाहत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ती युवती ज्या ठिकाणी सापडली, ती जागा अत्यंत निर्जन आहे. त्याठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या युवतीसोबत आणखीही काही युवक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.