Goa Assembly Election : गोव्यात भाजपसह काँग्रेस सत्तास्थापनेच्या पवित्र्यात

Goa Assembly Election : गोव्यात भाजपसह काँग्रेस सत्तास्थापनेच्या पवित्र्यात
Published on
Updated on

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : येत्या गुरुवारी म्हणजेच 10 मार्चला सायंकाळपर्यंत गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) निकालाचे चित्र स्पष्ट झालेले असेल. आमचेच सरकार सत्तारूढ होणार, असा दावा सत्ताधारी भाजपसह काँग्रेसनेही केला आहे. दोन्ही पक्ष आपापल्या या दाव्यावर ठाम आहेत. गुरुवारी सायंकाळी आम्ही राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करू, असे दोन्ही पक्षांतर्फे सोमवारी पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बहुमताचा दावा केलेला आहे. स्वबळावर भाजपचे सरकार येईल, या म्हणण्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी एखाददुसर्‍या आमदाराची गरज भासल्यास घेऊ, असे सांगून सरकार भाजपचेच हे पुन्हा स्पष्ट केले. (Goa Assembly Election)

राजकीय अभ्यासकांच्या मतानुसार, 2017 मध्ये निवडणूक निकालानंतर भाजपला सत्ता स्थापनेसाठी ज्या तडजोडी कराव्या लागल्या, त्या कराव्या लागू नयेत, म्हणून भाजपने यावेळी निवडणूकपूर्वच सर्व सज्जता केलेली आहे. कोणत्या पक्षाची आणि कोणत्या अपक्षाची मदत कशी घ्यावयाची, याची सर्व ती 'बेरीज' भाजपने करून ठेवलेली आहे.

प्रमुख विरोधी काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेच्या दाव्यावर ठाम आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच आम्ही राजभवनासमोर जाऊन बसू, असे काँग्रेस नेते माजी मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी सांगितले. 2017 मध्ये काँग्रेसला 17 जागा मिळूनही सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून काँग्रेसवर आजही चौफेर टीका होत असते.

मुख्यमंत्री कोण होणार, या विषयावर काँग्रेसचे घोडे अडले होते. त्यामुळे सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास गमवावा लागला. त्यामुळेच लोबो म्हणतात, पाच वाजताच राज्यपालांकडे जाऊ. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणतात, निकालानंतर नेत्याची निवड पाच मिनिटांत करू.

गोव्यात सरकार स्थापन करण्याविषयी दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पी. चिदम्बरम, दिनेश गुंडू राव, गिरीश चोडणकर आदींची रविवारी बैठक झाली. चिदम्बरम आणि दिनेश गुंडू राव रविवारीच रात्री गोव्यात दाखल झाले आणि बैठकांचे सत्र सुरू झाले.

चढा भाव शक्य

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजेच 'मगोप'ला दोन किंवा चार जागा मिळू शकतात. सत्तास्थापनेमध्ये आपण किंगमेकर ठरू, असे या पक्षाचे स्वप्न आहे. या पक्षाला तसेच अपक्षांना निकालानंतर 'चढा भाव' मिळू शकतो.

* 40 विधानसभा आमदार संख्या

* 21 बहुमतासाठीचा जादुई आकडा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news