Ramdas Athavale : तमिळनाडूप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य : रामदास आठवले

file photo
file photo

धुळे, पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजाला तमिळनाडू सरकारच्या पॅटर्न प्रमाणे राज्य शासनाने ओबीसी आरक्षण बाधित होणार नाही, अशा पद्धतीने आरक्षण दिले पाहिजे. यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज (दि.२) धुळ्यात सांगितले. देशात भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची युती 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तर इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. Ramdas Athavale

धुळे जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आगमन झाले. यावेळी चाळीसगाव चौफुलीवर त्यांचे स्वागत रिपाई चे जिल्हाध्यक्ष शशी वाघ यांनी केले. त्यांच्या समवेत राजेंद्र शिरसाठ, गौतम खंदारे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. Ramdas Athavale

यावेळी पत्रकारांबरोबर संवाद साधताना केंद्रीय मंत्री आठवले यांनी काँग्रेस पक्षावर तोफ डागली आहे. सध्या देशामध्ये भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असल्याचा दिशाभूल करणारा प्रचार सुरू आहे. मात्र भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात असे करता आले नाही.

Ramdas Athavale : जनमताच्या आधारावर भाजपा युती 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचा मोठा पाठिंबा आहे. या बळावर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष देशात 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. मणिपूरमध्ये कुकी समाज हा ट्रायबल आहे. यात न्यायालयाने दुसऱ्या समाजाला देखील ट्रायबल दर्जा देण्यासाठी राज्याला सुचवले आहे. मात्र, त्या राज्याने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मणिपूर मधील दोन्ही समाजाने शांतता ठेवली पाहिजे. मणिपूरमध्ये सध्या सुरू असलेली बाब मान खाली घालावी, अशीच परिस्थिती असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

बारा जागांचा फार्म्युला आघाडीचे बारा वाजवेल

वंचित आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युती संदर्भात देखील मंत्री आठवले यांनी भाष्य केले. वंचित आघाडी बरोबर युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विश्वासात घ्यावे लागेल. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपा संदर्भात बारा जागांचा दिलेला प्रस्ताव हा चांगला आहे. या प्रस्तावामुळे या आघाडीचे बारा वाजतील, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

तमिळनाडू पॅटर्न प्रमाणे मराठा आरक्षण द्यावे

महाराष्ट्रात तामिळनाडू सरकार प्रमाणेच आरक्षण देणे शक्य आहे. या राज्यात 69 टक्के आरक्षण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यात ओबीसी चे दोन गट आहेत. त्यामुळे राज्यात ओबीसी मधून वेगळा गट करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सरकारने केला पाहिजे. मनोज जरांगे -पाटील यांना मुंबई येथे येण्याची गरजच भासणार नाही. 20 जानेवारीच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आपण चर्चा करून महाराष्ट्रात तामिळनाडू पॅटर्नप्रमाणे ओबीसींवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग काढण्याची सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news