नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
कोरोना संसर्गाचे नवीन स्वरूप 'ओमायक्रॉन' चा सामना करण्यासाठी दिल्ली सज्ज आहे. अशात राज्यात आढळणाऱ्या प्रत्येक कोरोना बाधितांची जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केली. ओमायक्रॉन तसेच इतर व्हेरियंटचे किती रूग्ण राज्यात आहेत, याची माहिती घेत, त्याअनुषंगाने पुढील धोरणांची आखणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने राजधानीत बुस्टर डोस लावण्याची परवनागी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. राज्यात ओमायक्रॉन बाधितांची वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आयोजित राज्य मंत्रीमंडळ तसेच दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (डीडीएमए) बैठकीनंतर पत्रकार परिषदेतून त्यांनी घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली.
ओमायक्रॉनसंबंधी दिल्लीकरांना घाबरण्याची गरज नाही
रूग्णालये,औषधांसंबंधी सर्व तयारी सरकारने केली आहे. ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी 'होम आयसोलेशन प्रोग्राम' बळकट करण्याची गरज यानिमित केजरीवाल यांनी व्यक्त केली. येत्या बुधवारी यासंबंधी बैठक बोलावण्यात आल्याचे देखील ते म्हणाले.कोरोनाच्या प्रत्येक व्हेरियंटचा सामना करण्यासाठी मास्क सर्वात महत्वाचे हत्यार आहे. अशात मास्क घालूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले.
दिल्लीत बुस्टर डोस लावण्यासाठी आवश्यक अशी पायाभूत रचना करण्यात आली आहे. अशात ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता कोरोनापासुन बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने बुस्टर डोस लावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केजरीवाल यांच्याकडून करण्यात आली.
राजधानीतील नागरिकांसाठी नि:शुल्क शिधा वाटपाच्या योजनेला मंत्रीमंडळाच्या बैठकीतून सहा महिन्याचा विस्तार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मे पर्यंत दिल्लीकरांना नि:शुल्क शिधा देण्यात येईल. शिवाय चांगले शिक्षक घडवण्यासाठी शिक्षक विद्यापीठाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात यासंबंधी विधेयक सादर करण्यात येणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत एकूण २६ ओमायक्रॉन रूग्ण आढळले असून यातील १२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे, तर १४ रूग्णांवर उपचार सुरू आहे. जवळपास सहा महिन्यानी राजधानीत रविवारी दिवसभरात १०७ कोरोनाबाधित आढळले आहेत. यापूर्वी २५ जूनला ११५ कोरोनाबाधित आढळले होते. राज्यात दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.१७ टक्के नोंदवण्यात आले असून हॉटस्पॉटची संख्या १५७ पर्यंत पोहोचली आहे.
हेही वाचा