कोल्हापूर कलबुर्गी, सह्याद्री एक्सप्रेस लवकरच सुरू करू ; मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे आश्वासन

कोल्हापूर कलबुर्गी, सह्याद्री एक्सप्रेस लवकरच सुरू करू ; मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे आश्वासन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी शुक्रवारी कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सकाळची कोल्हापूर कलबुर्गी, सह्याद्री एक्सप्रेस लवकरच सुरू करू, असे आश्वासन रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांना दिले. मुंबई येथून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालावणी यांनी शुक्रवारी पुणे-कोल्हापूर विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या मार्गावरील दुहेरीकरणाच्या आणि विद्युतीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु दुबे, पुणे विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त उदय सिंग पवार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. स्वप्नील नीला, स्टेशन प्रबंधक रमेश तांदळे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व अन्य उपस्थित होते.

मिरज जंक्शन येथे रेल्वे सल्लागार समिती सदस्य व रेल्वे प्रवासी सेना व रेल्वे प्रवासी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी सकाळच्या सत्रात कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करावी व कोल्हापूरहून सोडणे शक्य नसल्यास ही गाडी मिरज जंक्शन मधून सोडण्यात यावी. तसेच कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यात यावी. कोयना एक्सप्रेस या गाडीस पूर्वीच्या प्रमाणे डबे लावण्यात यावेत. मिरज परळी एक्सप्रेस ही गाडी डेमो ऐवजी आयसीएफ रॅक ने सोडण्यात यावी व मिरज बेळगाव पॅसेंजर सुरू करण्यात यावी व दादर पंढरपूर एक्सप्रेस या गाडीचा मिरज पर्यंत विस्तार करून सोडण्याचे मंजूर झालेले असून ही गाडी ताबडतोब सुरू करण्यात यावी असे आशियाचे निवेदन महाप्रबंधकांना देण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news