
पुढारी ऑनलाईन: अमेरिकेतील हिंडेनबर्ग या वित्त संशोधक संस्थेने अहवाल प्रकाशित केला. या अहवालात अदानी समूहासंदर्भातील धक्कादायक खुलासे करण्यात आले. या दिवसापासून अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने कोसळत आहेत. याचाच परिणाम त्यांच्या क्रमवारीतही दिसत आहे. जगातील श्रीमंतांच्या टॉप 20 यादीतून आता 'अदानी' बाहेर पडले असून, त्यांचे मार्केटमधील शेअर्स देखील 60% पर्यंत घसरले आहेत.
हिंडेनबर्ग अहवाल सार्वजनिक झाल्यापासून उद्योगपती गौतम अदानी यांचे शेअर्स घसरून, त्यांच्या निव्वळ संपत्तीला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते, आता या घटनेनंतर अदानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत टॉप 20 मध्येही नाहीत, असे चित्र दिसत आहे.
ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी हे जगभरातील श्रीमंतांच्या टॉप 20 यादीतून बाहेर पडले असून, सध्या ते 22 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांचे एका दिवसात सुमारे 10 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे, फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत 12.5 अब्ज डॉलरची वाढ झाली असून, ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सध्या 13 व्या स्थानावर पोहोचले असल्याची माहिती ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्समध्ये देण्यात आली आहे.