व्यग्र जीवनशैलीमुळे आहारसवयी, वर्तणूक सवयी यामध्ये बदल झालेले दिसून येतात. त्याचबरोबर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग होत असतानाच पचनसंस्थेचा कर्करोग होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. सध्या भारताचा या कर्करोग होण्यामध्ये चौथा क्रमांक लागतो. सर्वाधिक लोकांना आपल्या विळख्यात घेणारा हा कर्करोग आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हा कर्करोग अधिक ग्रासतो. अगदी शांतपणे हा शरीरात मूळ धरतो आणि हळूहळू पसरत जातो.
शरीरातील अंतर्गत अवयव जसे मोठे आतडे, मलाशय, अन्ननलिका, पोट, मूत्रपिंड, पित्ताशय, पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड, अपेंडिक्स, लहान आतडे यांच्यावर या कर्करोगाचा परिणाम होताना दिसतो. पचनसंस्थेचा कर्करोग म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टाईनल कर्करोगाने ग्रस्त लोकांना सुरुवातीला पोटदुखी, अपचन तसेच मलविसर्जनाला त्रास होणे आदी गोष्टींना सामोरे जावे लागते. अर्थात, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
पचनसंस्थेच्या कर्करोगाबाबत मुळातच जागृती कमी आहे. त्यामुळे या रुग्णांची देखभाल करण्याविषयीही फारशी माहिती नाही. त्यामुळे गॅस्ट्रो इंटेस्टाईनल कर्करोगाविषयी जागृती करणे तसेच पचनसंस्था चांगली ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे. यासाठी एक संपूर्ण व्यवस्थाच निर्माण करावी लागणार आहे. या व्यवस्थेअंतर्गत रुग्णांची लवकरात लवकर तपासणी करणे, आधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करणे आणि त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी योग्य देखभाल करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
जीवनशैलीत बदल गरजेचे : रोगाची प्रारंभिक लक्षणे नियंत्रित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला डॉक्टर देतात तो म्हणजे जीवनशैलीत बदल करणे. त्याअंतर्गत पोषक आहार घेणे, व्यायाम करणे इत्यादींचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त वेळच्या वेळी वैद्यकीय तपासण्या करण्याकडेही दुर्लक्ष होता कामा नये.
योग्य वेळी चाचण्या, योग्य उपचार : रुग्णामध्ये दिसणारी लक्षणे गांभीर्याने घेतली पाहिजेत. गॅस्ट्रो इंट्रोलॉजिस्टने सुचविल्यानुसार आवश्यक त्या चाचण्या करणे महत्त्वाचे आहे. पचनसंस्थेच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी फीकल अकल्ट ब्लड टेस्ट, नॉन इन्व्हेसिव्ह चाचण्या जसे अल्ट्रासोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि एमआरआय यांचा समावेश होतो. या सर्व चाचण्यांमुळे उपचार करणे सोपे जाते.
याखेरीज कोलनस्कोपीच्या मदतीने डॉक्टर पित्ताशयाची चाचणी करू शकतात. त्यामधून विशेष प्रकारच्या कर्करोगाचे निदान करण्यास मदत मिळते. त्यामुळे उपचार करणे सोपे जाते. हा कर्करोग लवकर समजत नाही, ही एक महत्त्वाची त्रुटी या आजारात आहे. त्यामुळे पचनसंस्थेच्या कर्करोगाची काही लक्षणे दिसल्यास त्वरित वेळ न घालवता त्यावर उपाय करणे हाच बचावाचा मार्ग आहे.