दापोडी, पुढारी वृत्तसेवा: व्यावसायिक सिलिंडर तब्बल शंभर रुपयांनी स्वस्त झाले असून, सलग दुसर्या महिन्यात दर कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरचे दर मात्र 'जैसे थे' आहेत. सध्या घरगुती सिलेंडर हा 1055 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सरकारला गरिबांची काळजी नसून व्यावसायिकांची चिंता असल्याचे दिसून येत आहेत. सरकारला सामान्य नागरिकांची चिंता का नाही, असा सवाल सांगवी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, फुगेवाडी आणि पिंपळे सौदागर परिसरातील गृहिणींनी केला आहे.
चूल काळाच्या पडद्याआड झाल्यामुळे गॅसला वाढती मागणी आहे. स्वयंपाक बनविण्याचे महत्वपूर्ण साधन म्हणून गॅसला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिलेंडर मुख्यतः दोन प्रकारामध्ये वापर केला जातो. व्यावसायिक व घरगुती सिलेंडर म्हणून वापर केला जातो. व्यावसायिक सिलेंडर हा 19 किलोचा असून तो फक्त 1901 रुपयांना मिळत आहे. तर घरगुती सिलेंडर हा 14 किलो 200 ग्रॅमचा असतो. तो मात्र एक हजार रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत घरगुती सिलेंडर वापरासाठी परवडत नाही. मात्र व्यावसायिक सिलेंडरचे भाव दोन महिन्यात दोन वेळा दर कमी केले आहेत.
पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी केले जात आहेत. तसेच व्यावसायिक सिलेंडरचे ही भाव कमी केले जात आहेत. मग वाढत्या महागाईत घरगुती गॅस स्वस्त का केला जात नाही? त्यामुळे गरिबांचा विचार करून सरकारने घरगुती गॅस स्वस्त करून दिलासा द्यावा. या महागाई वाढीमुळे महिलांचे मासिक बजेट कोलमडले आहे.
– रेखा धुंदळे, गृहिणी, पिंपळे सौदागर.जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. हॉटेल व्यावसायिक खाद्यपदार्थांचे दर कमी होत नाहीत. त्यामुळे वाढत्या महागाईत सामान्य माणसाला जगणे अवघड झाले आहे. त्यात घरगुती सिलेंडरचे भाव तर एक हजार रुपयांवर गेल्यामुळे आता जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.
– दीपाली कणसे, गृहिणी, दापोडी
एकीकडे पेट्रोलचे दर दहा रुपयांनी कमी केले जात आहेत. घरगुती सिलेंडरची वारंवार दर वाढवले जात आहेत. मात्र केंद्र सरकारला गोरगरिबाची चिंता नसल्याने घरगुती सिलेंडरचे दर मात्र 'जैसे थे' आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.