अबब ! लसूण तब्बल 500 रुपये किलो ! 

अबब ! लसूण तब्बल 500 रुपये किलो ! 
पुणे : पुढारी वृत्तसेवा : लसणाशिवाय फोडणी शक्यच नाही. फोडणीशिवाय झणझणीतपणा येत नाही. आत्ता लसणाचे भाव गगनाला भिडले आहेत. दर उतरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरू लागली आहे. त्यामुळे आयत्या  लसूणपेस्टवरच भागवावे लागणार असल्याची प्रतिक्रिया मंडईत खरेदीसाठी आलेल्या गृहिणी प्रिया तिकोणे यांनी दिली. मध्य प्रदेशातील निमच, मंदसौर, जावरा, पितळिया, इंदूर भागातून दररोज 14 ते 15 ट्रकमधून लसूण शहरातील बाजारपेठांमध्ये  दाखल होत आहे. गतवर्षी हिवाळ्यासह उन्हाळाही लांबल्याने यंदा लसणाचा हंगाम लांबणीवर पडला आहे.
दरम्यानच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा फटकाही लसणाला बसला. पावसाचा फटका बसल्याने भविष्यात लसूण खराब होऊन तो फेकून देण्याऐवजी लसणाला मिळत असलेल्या उच्चांकी दराचा फायदा घेण्यास शेतकरीवर्गाने सुरुवात केली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या लसणाची काढणी करून माल बाजारात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीला दर्जाहीन लसूणही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने घाऊक बाजारात दहा किलो लसणाचे दर 1 हजार 500 ते 3 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. तर, किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर 450 ते 500 रुपयांपर्यंत गेले आहेत. हिवाळ्याच्या सुरुवातीला लसणाच्या दरात सातत्याने वाढ होऊन दर 500 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे तसेच, ग्राहकही लसणाच्या भावाची नुसती विचारणा करून निघून जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.फ
घाऊक  (प्रतिकिलो) वैशिष्ट्ये
उटी 200 ते 350 रुपये  : आकाराने मोठा, चमकदार,  जाड पाकळ्या
देशी 150 ते 270 रुपये : मध्यम आकार, कमी चमकदार, लहान पाकळ्या
येत्या काळात लसणाला परराज्यातून वाढणारी मागणी तसेच केंद्र सरकारकडून होणारी निर्यात, या गोष्टींवर लसणाची दरवाढ अवलंबून राहील.                   
                                                                            – सुरज संचेती,  लसणाचे व्यापारी, मार्केट यार्ड
उन्हाचा चटका लागण्यास सुरुवात झाल्याने पुणेकरांची पावले सरबत, उसाच्या रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. परिणामी, यार्डातील घाऊक बाजारात लिंबाला मागणी होऊ लागली आहे. बाजारात येत असलेल्या लिंबांपेक्षा मागणी मोठी असल्याने लिंबाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात एका नगाची चार ते पाच रुपयांना विक्री सुरू आहे. मार्च महिन्याला सुरू होण्यात आणखी 18 दिवस आहेत. अशात उन्हाच्या झळा बसून अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
त्यामुळे  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबांना मागणी होऊ लागली आहे. सद्य:स्थितीत बाजारात अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांतून दररोज 15 ते 20 किलोच्या एक हजार ते 1 हजार 200 गोण्यांची आवक होत आहे. त्याच्या एका गोणीला दर्जानुसार 300 ते 1300 रुपये भाव मिळत आहे. मागील महिन्यात हीच आवक 2 हजार ते 2 हजार 400 गोणी एवढी होती. मात्र, त्याचे दर 200 ते 300 रुपयांपर्यंत होते. मात्र, सध्या लिंबाचे उत्पादन घटल्याने लिंबाची आवक निम्म्याने घटून 1200 गोण्यांवर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news